दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे (Sushant Singh Rajput) १४ जून २०२० आकस्मिक निधन झाले. त्याच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला. अभिनेत्याची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली याबद्दल चौकशी झाली. अशातच काही दिवसांपूर्वी, सीबीआयने मुंबई न्यायालयात या प्रकरणाशी संबंधित क्लोजर रिपोर्ट दाखल केला, ज्यामध्ये ही आत्महत्या असल्याचे म्हटलं गेलं. तसंच याप्रकरणी सीबीआयने अभिनेत्री रिया चक्रवर्तीलाही (Rhea Chakraborty) क्लीन चिट दिली. पण या संपूर्ण काळात रिया तसंच तिच्या कुटुंबियांच्या कुटुंबावर खूप मोठा आघात झाला.

या काळात रिया तसंच तिच्या कुटुंबियांना संघर्षमय परिस्थितीतून जावे लागले. याबद्दल रियाची मैत्रीण निधी हिरानंदानीने ‘स्क्रीन’च्यामुलाखतीत भाष्य केलं आहे. या संपूर्ण प्रकरणात रियाचे कुटुंब कसे एकटे पडले होते? आणि त्यांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त झाले होते याबद्दल सांगितले. या आरोपांमुळे रिया आणि शोविक (रियाचा भाऊ) दोघांनीही त्यांच्या आयुष्यातली मौल्यवान वर्षे गमावली. तसंच निधी हिरानंदानीने रिया आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या नात्याबद्दलही भाष्य केलं.

निधीने रियाच्या मीडिया ट्रायलमधील संघर्षाची आठवण सांगताना म्हटलं की, “जेव्हा रिया बाहेर आली तेव्हा सर्व पत्रकार तिच्यावर तुटून पडले होते. त्या दिवशी ती घरी आली तेव्हा तिच्या हातावर आणि चेहऱ्यावर जखमा होत्या. तेव्हा मला पूर्णपणे असहाय्य वाटत होते. मी तिच्या आईबरोबर बसली होती आणि आम्ही टीव्ही पाहत असताना मी रियाचा चेहरा पाहिला, ती ज्या प्रकारे जमिनीवर पडली, ते मी कधीही विसरणार नाही. तो तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण होता.”

सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

पुढे निधी म्हणाली की, “सुरुवातीला आम्हाला खूप शंका होती. जे काही घडलं ते आम्हाला समजत होतं आणि मला आठवतंय की, रिया आणि शोविक किती निराश झाले होते. इंद्रजीत आणि संध्या सुशांतला कुटुंबासारखं वागवत होते. पण त्याच्या मृत्यूनंतर तेही दु:खी होते. याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला होता. कुटुंबाला चांगले जगायचे होते, त्यांना हे सगळं संपवायचं होतं. या सगळ्यात रियाच्या आईचा आवाजही गेला होता आणि ती बोलू शकत नव्हती.”

रिया चक्रवर्ती आणि भाऊ शोविक (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
रिया चक्रवर्ती आणि भाऊ शोविक (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

पुढे निधीने शोविक (रियाचा भाऊ) बद्दल सांगितलं की, “फक्त २३ वर्षांचा होता, तो त्याची ‘कॅट’ची परीक्षा देत होता. त्याला चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला, पण तो जाऊ शकला नाही. त्याने आयुष्यातील खूप मौल्यवान वर्षे यामुळे गमावली. तसंच रियाचे करिअरही गेलं. त्या काळात ती कोणताही चित्रपट करू शकली नाही. त्याच्याकडून खूप काही हिरावून घेतले गेले. चौकशी आणि आरोपांमुळे तिला झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आयुष्य लागेल.”