दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आकस्मिक निधनाने त्याच्या चाहत्यांसह मनोरंजन विश्वालाही मोठा धक्का बसला. सुशांतचे निधन होऊन आता इतका काळ लोटला आहे, तरीही त्याचे अनेक चाहते आणि सहकलाकार त्याच्या आठवणीत भावूक होत असतात. अशातच ‘ससुराल सिमर का’फेम आणि सुशांत सिंहची जवळची मैत्रीण क्रिसन बॅरेटोने (Krissann Barretto) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या मृत्यूबद्दल काही खुलासे केले आहेत. शिवाय त्याचा तिच्या आयुष्यावर झालेल्या परिणामाबद्दलही तिने सांगितलं आहे.

शार्दुल पंडितच्या ‘अनसेन्सर्ड विथ शार्दुल’ या पॉडकास्टमध्ये क्रिसन बॅरेटोने सुशांतच्या मृत्यूबद्दल बोलल्यामुळे तिला व्यावसायिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागल्याचे सांगितलं. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, सुशांतबद्दल बोलल्याबद्दल तिला केवळ टीकेचा सामना करावा लागला नाही, तर काही प्रॉडक्शन हाऊसने तिला काम देण्यासही नकार दिला होता. तसंच लोकांनी तिच्या दुःखासाठी तिला खूप ट्रोलही केल्याचे तिने सांगितलं.

याबद्दल क्रिसनने म्हटलं की, “भारतात जर तुम्ही अभिनेता-अभिनेत्री असाल तर तुम्ही दुःख करू शकत नाही. जर तुमचा मित्र गेला तर लोक असे गृहीत धरतात की, तुम्ही फक्त लक्ष वेधण्यासाठी पोस्ट करत आहात. तुम्ही कॅमेऱ्यासमोर काम करता म्हणून त्यांना कायम हेच वाटते की, तुम्ही केवळ अभिनय करत आहात, त्यामुळे इथे खऱ्या भावनांना स्थान नाही.”

यानंतर क्रिसन म्हणाली की, सुशांतच्या प्रकरणावर बोलणे सोपे नव्हते, विशेषतः जेव्हा हे प्रकरण वादग्रस्त आणि कट रचल्याच्या आरोपांनी वेढलेले होते. याबद्दल ती म्हणाली की, “त्याच्या मृत्यूबद्दल तेव्हा कुणी बोलत नव्हते, त्यामागे एक कारण होते; कारण यामध्ये अनेक धोके होते. मी माझे करिअर, माझे आयुष्य धोक्यात घातले. माझे आई-वडीलही माझ्यावर रागावले होते. माझे मित्रही मला फोन करून म्हणायचे, गप्प बस, याबद्दल काही बोलू नको. पण, मी गप्प राहू शकत नव्हते.”

यापुढे सुशांतच्या नावाचा वापर करून प्रसिद्धी मिळवल्याच्या आरोपांना उत्तर देताना क्रिसन म्हणाली, “लक्ष वेधण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याइतका कोणीही मूर्ख नाही. तुम्ही अशी भूमिका घेतल्याने किती दरवाजे बंद होतात हे लोकांना समजत नाही. हे माझ्याबरोबर घडलं. मला कामावरून काढून टाकण्यात आले. मी खूप काही गमावले आणि मी माझ्या मित्रासाठी केले, प्रसिद्धीसाठी नाही. मी काय गमावले याची मला पर्वा नाही.”

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने न्यायालयासमोर शनिवारी (२३ मार्च) क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टनुसार सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे खरे कारण आत्महत्या असल्याचे सांगितले गेले. तसंच याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासह सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात आले.