कोविड काळात अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या धक्कादायक मृत्यूमुळे संपूर्ण सिनेसृष्टी आणि त्याचा चाहता वर्ग हादरला. सुशांतने त्याच्या मुंबईच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं, पण नंतर कित्येक महीने ही आत्महत्या नसून हा खून आहे हे सिद्ध करण्याचे बरेच प्रयत्न झाले. या रहस्यमय मृत्यूमुळे बॉलिवूडकडे बघायचा लोकांचा दृष्टिकोनसुद्धा बदलला.
आता मात्र सुशांतने ज्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली त्याबद्दल एक वेगळीच गोष्ट समोर येत आहे. सुशांतचा मुंबईतील हा फ्लॅट गेली अडीच वर्षं भाड्याने द्यायचा म्हणून रिकामा आहे. रीयल इस्टेट ब्रोकर रफीक मरचंट यांनी नुकताच या सी फेसिंग फ्लॅटची एक छोटीशी क्लिप पोस्ट केली आहे आणि या फ्लॅटचं ५ लाख रुपये प्रती महिना एवढं भाडं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
त्यांनी ही गोष्टदेखील स्पष्ट केली आहे की या फ्लॅटचे मालक देशाच्या बाहेर राहतात आणि ते हा फ्लॅट कोणत्याही बॉलिवूड कलाकाराला देण्यास इच्छुक नाहीत. सध्या तरी त्यांना या फ्लॅटसाठी एखाद्या कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या भाडेकरूची गरज आहे. १४ जून २०२० रोजी या फ्लॅटमध्ये सुशांत सिंगचा मृत्यू झाला होता, नंतर तपासादरम्यान ही आत्महत्या असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं.
रफीक यांनी ‘बॉलिवूड हंगामा’शी याबद्दल संवाद साधताना सांगितलं, “लोक या घरात यायला घाबरत आहेत. सुशांतच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर हा फ्लॅट पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा कमी झाली आहे. घरमालकही फ्लॅटची किंमत खाली आणायला तयार नाही, तसं झालं तर हा फ्लॅट नक्की विकला जाईल. सुशांत याच घरात राहायचा याचा काही लोकांना अजिबात फरक पडत नाही, पण नंतर त्यांचे मित्र नातेवाईक हे त्यांचं मतपरिवर्तन करतात.” सुशांतच्या मृत्यूमागचं कारण स्पष्ट झालं असलं तरी यामागचं गूढ अजूनही कायम आहे.