सुश्मिता सेन ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या स्टाइल, फिटनेस आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी सुश्मिता सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती अनेक इव्हेंट्सला हजेरी लावत असते. ती आपल्या मुलींबद्दल व वैयक्तिक आयुष्याबद्दलही बोलत असते.
सुश्मिता सेनने लग्न केलेलं नाही, पण तिला रेने व अलीसा या दोन मुली आहेत. या दोन्ही मुलींना सुश्मिताने दत्तक घेतलं होतं. अलीसा अजून लहान आहे, पण रेने २४ वर्षांची आहे. रेनेला आईप्रमाणे अभिनयक्षेत्रात करिअर करायचं आहे. याबाबत सुश्मितानेच खुलासा केला आहे.
नुकतंच ‘इन्स्टंट बॉलीवूड’शी बोलताना सुश्मिता सेन म्हणाली, “रेनेला अभिनेत्री व्हायचं आहे आणि ती खूप चांगली अभिनेत्री होईल. तिची तयारी चालू आहे.” दरम्यान, रेनेबद्दल बोलायचं झाल्यास तिने २०२१ मध्ये ‘सुट्टाबाजी’ या लघुपटात अभिनय केला होता. इतकंच नाही तर सुश्मिताच्या ‘ताली’ या वेब सीरिजमध्ये महामृत्युंजय मंत्रालाही रेनेने आवाज दिला होता.
खूपच साधं आयुष्य जगतो आमिर खानचा लेक, जुनैद खान काय काम करतो? जाणून घ्या
सुश्मिताचं रेने व अलीसाशी खूपच सुंदर बाँडिंग आहे. सुश्मिता आपल्या लेकींबरोबर अनेक कार्यक्रमांना जात असते. “माझ्या मुलींना वडील नसल्याची उणीव कधीच जाणवत नाही. त्यांना वडिलांची गरज नाही. तुम्हाला त्याच गोष्टींची उणीव जाणवते, जी तुमच्याकडे असते. जी गोष्ट तुमच्याकडे कधीच नव्हती, त्या गोष्टीची उणीव कशी भासणार,” असं सुश्मिता मुलींचं एकटीने संगोपन करण्याबाबत म्हणाली होती.