बॉलीवूडचे सगळेच कलाकार अलीकडच्या काळात सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपले आवडते कलाकार व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यात काय करतात याकडे त्यांच्या चाहत्यांचं नेहमीच लक्ष असतं. सध्या सुश्मिता सेनने तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये वाढदिवसाची तारीख बदलल्यामुळे चर्चा रंगल्या आहेत. नोव्हेंबर १९७५ मध्ये या मिस युनिव्हर्सचा जन्म झाला. परंतु, सुश्मिताने तिच्या सोशल मीडियावर तिची नवीन जन्मतारीख लिहिली आहे. तिची दुसरी जन्मतारीख आहे २७ फेब्रुवारी २०२३. हा बदल का करण्यात आला आहे यामागचं नेमकं कारण काय आहे जाणून घेऊयात…
बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनच्या आयुष्यात गेल्यावर्षी एक मोठी घटना घडली. एका वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आला होता. इन्स्टामग्रावर एक व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने या सगळ्या घटनांबाबत आणि जन्मतारीख का बदलली यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. हा व्हिडीओ अभिनेत्रीने एका फार्मास्युटिकल कंपनीच्या सहकार्याने तयार केला आहे.
सुश्मिताला २७ फेब्रुवारी २०२३ रोजी हृदयविकाराचा झटका आला. याच दिवशी नवीन आयुष्य मिळाल्याने अभिनेत्रीने तिच्या वाढदिवसाची तारीख बदलली आहे. याबद्दल अभिनेत्री सांगते, “माझं आयुष्य एका गोष्टीसारखं आहे. हे आयुष्य जगताना मी अनेक चढउतार पाहिले आहेत असंच एके दिवशी शूटिंग करताना माझ्या आयुष्यात एक मोठा ट्विस्ट आला अन् सगळंच बदललं. त्यावेळी मला हृदयविकाराचा झटका आला होता. ती ४५ मिनिटं माझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची होती. तेव्हा असं जाणवलं… माझं गोष्टीरुपी आयुष्य आता संपण्याच्या मार्गावर आहे.”
सुश्मिता पुढे सांगते, “मी माझ्या डॉक्टरांचे निश्चितच आभार मानेन. कारण, आज मी फक्त त्यांच्यामुळेच तुमच्यासमोर उभी आहे. डॉक्टरांमुळेच माझ्या आयुष्यात एका गोष्टीची सुरुवात झाली. त्यांनी माझ्यासाठी एक नवीन कथा लिहिली आणि मला एक नवीन दिशा मिळाली. २७ फेब्रुवारी २०२३ – ही माझी दुसरी जन्मतारीख. हा दिवस मी सर्व डॉक्टरांना समर्पित करणार आहे. कारण, याचदिवशी माझा दुसरा जन्म झाला.”
हेही वाचा : भर कॉन्सर्टमध्ये एकाने प्रायव्हेट पार्टवर केली कमेंट, भडकलेल्या मोनाली ठाकुरने कार्यक्रम थांबवला अन्…
४८ वर्षीय सुश्मिता सेनवर हृदयविकाराचा झटका आल्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तिला ‘आर्या ३’च्या शूटिंगदरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. “त्या दिवसाची ती ४५ मिनिटं माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी आणि सर्वात कठीण अशी ४५ मिनिटं होती” असंही अभिनेत्रीने सांगितलं आहे. याशिवाय “मी नेहमीच आयुष्याच्या प्रेमात होते, अजूनही आहे आणि नेहमीच राहीन” असं गेल्यावर्षी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना सुश्मिताने सांगितलं होतं. तसेच एवढ्या मोठ्या संकटातून सुखरुप घरी परतल्यामुळे अभिनेत्री नेहमीच कृतज्ञता व्यक्त करते.
© IE Online Media Services (P) Ltd