ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विधी केल्या, त्या दिवशी भारतातील चित्रपटसृष्टीतील अनेक व्यक्तींनी सोशल मीडियावर भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना शेअर केली. हा कार्यक्रम देशाच्या धर्मनिरपेक्ष मूल्यांच्या विरोधात असल्याचा दावा करून या कार्यक्रमावर अनेकांनी टीका केली.
बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने संविधानाच्या प्रस्तावनेचा फोटो असलेली लेखक-दिग्दर्शक अतुल मोंगिया यांची इन्स्टाग्राम पोस्ट रिपोस्ट करून धर्मनिरपेक्षतेचे समर्थन करणाऱ्या लोकांमध्ये सामील झाली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये “भारत! माझं माझ्या देशावर प्रेम आहे आणि कोणतेही द्वेषाचे राजकारण हे प्रेम बदलू शकत नाही,” असं लिहिलं होतं. सुश्मिताने या पोस्टला #मदरलँड म्हणजेच ‘मातृभूमी’ असा हॅशटॅग दिला होता.
केवळ सुश्मिताच नव्हे तर मल्याळम सिनेसृष्टीतील पार्वती थिरुवोथू, रिमा कल्लिंगल, दिव्या प्रभा, राजेश माधवन, कानी कुस्रुती, दिग्दर्शक जिओ बेबी, आशिक अबू, कमल केएम, कुंजिला मास्किलामनी आणि गायक सूरज संतोष यांच्यासह अनेकांनी संविधानाच्या प्रस्तावनेचा फोटो शेअर केला होता. काहींना या पोस्टसाठी चाहत्यांकडून समर्थन मिळालं, तर काहींना ट्रोलही करण्यात आलं.
अमिताभ बच्चन यांनी शेअर केला रेखांबरोबरचा ‘तो’ फोटो; म्हणाले, “या फोटोमागे खूप मोठी…”
दरम्यान, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये दाक्षिणात्य स्टार राम चरण, रजनीकांत, रक्षित शेट्टी, बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर, आयुष्मान खुराना, कतरिना कैफ, विकी कौशल, माधुरी दीक्षित, श्रीराम माधव नेने, रोहित शेट्टी आणि राजकुमार हिरानी यांचा समावेश होता.