सुश्मिता सेन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर सुश्मिताने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर सुश्मिता मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते. १९९४ मध्ये सुश्मिताने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला. दरम्यान, एका मुलाखतीत सुश्मिताने ‘मिस युनिव्हर्स’ बनल्यानंतरचा एक किस्सा सांगितला आहे.
सुश्मिता म्हणाली, “मिस युनिव्हर्स जिंकण्यापूर्वी मी जेवणाच्या टेबलावरचा शिष्टाचार शिकले नव्हते. मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्यानंतर मी मेक्सिको सिटीमध्ये एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणी म्हणून गेले होते. त्यावेळी मी फक्त १८ वर्षांची होते. मला इंग्रजीही बोलता येत नव्हतं. कार्यक्रमात मी बराच वेळ बसून होते. मला खूप भूक लागली होती. शेवटी मी माझ्या पर्यटन व्यवस्थापकाला सांगितले की, मला खूप भूक लागली आहे. त्यावर ती म्हणाली की, तू इथे प्रमुख पाहुणी आहेस. तू जेवायला सुरुवात करू शकतेस.”
सुश्मिता पुढे म्हणाली “त्या कार्यक्रमात सेव्हन कोर्स डिनरचे आयोजन करण्यात आले होते. पण हे जेवण कसे सुरू करायचे याबाबत मला काहीच कल्पना नव्हती. अखेर मेक्सिकोच्या पर्यटन व्यवस्थापकाने मला मदत केली. त्यावेळी मला खूप विचित्र वाटलं. मला ती गोष्ट पुन्हा अनुभवायची नव्हती. त्या घटनेनंतर शिष्टाचार शिकवणाऱ्या शिक्षकाने मला सांगितले की, कोणत्याही कार्यक्रमात जाण्याअगोदर घरून पोटभर जेवण करुन जा. म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला जेवणाचा मोह होणार नाही.”
सुश्मिताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या वर्षी १५ ऑगस्टला तिची ‘ताली’ ही वेब सीरिज प्रसिद्ध झाली. या वेब सीरिजमध्ये तिने तृतीयपंथीय व्यक्तीची भूमिका साकरली होती. तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ही सीरिज आहे. काही दिवसांपूर्वीच तिची ‘आर्या ३’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. प्रेक्षकांकडून या वेब सीरिजला चांगला प्रतिसाद मिळाला.