१९९४ मध्ये मिस युनिव्हर्स हा खिताब जिंकल्यानंतर सुष्मिता सेन खूप लोकप्रिय झाली. तिने केवळ तिच्या सौंदर्यानेच नाही तर तिच्या बोलण्यातूनसुद्धा लोकांवर प्रभाव पाडला. ही स्पर्धा जिंकल्यानंतर दोन वर्षांनी तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि एकामागून एक सुपरहिट चित्रपट दिले. सुश्मिता नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलत असते. अशाच एका मुलाखतीमध्ये सुश्मिताने तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडबद्दल भाष्य केलं होतं.
सुश्मिताला मिस युनिव्हर्स हा खिताब जिंकता यावा यासाठी तिच्या या बॉयफ्रेंडने त्याची नोकरीही सोडल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. प्रसिद्ध अभिनेते फारूख शेख यांच्या ‘जिना ईसी का नाम है’ या कार्यक्रमात सुश्मिताने या गोष्टीचा खुलासा केला होता. याच एपिसोडमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुश्मिताने तिचा पहिला बॉयफ्रेंड रजत ताराबद्दल भाष्य केलं आहे. त्यावेळी रजतने सुश्मिताची प्रचंड मदत केल्याचं तिने सांगितलं.
आणखी वाचा : “माझ्या नवऱ्याकडे…”, कोविडमध्ये आदित्य चोप्राने घेतलेल्या ‘या’ निर्णयाचं राणी मुखर्जीने केलं कौतुक
एका मॉडेलिंगसाठीच्या ऑडिशनदरम्यान सुश्मिता ही प्रथम रजतला भेटली होती. सुश्मिताच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा तिला मिस युनिव्हर्ससाठी प्रशिक्षण दिलं जाणार होतं त्यासाठी तिला मुंबईत राहायला यावं लागणार होतं. सुश्मिता याविषयी म्हणालेली, “मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, हा माझा बॉयफ्रेंड आहे रजत. हा माझ्यासाठी फार खास आहे, कारण जेव्हा मिस युनिव्हर्सच्या प्रशिक्षणासाठी जेव्हा मला मुंबईला यावं लागलं तेव्हा हे शहर माझ्यासाठी एका परदेशाप्रमाणेच होतं. त्यावेळी मी दिल्लीत असताना मुंबईत येण्यासाठी नकार दिला होता.”
त्यावेळी रजत एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये नोकरी करत होता अन् त्यावेळी सुश्मिताबरोबर मुंबईत येण्यासाठी त्याने त्याच्या या नोकरीवर पाणी सोडलं होतं. याविषयी सुश्मिता सांगते, “रजतने त्याच्या कंपनीमध्ये जाऊन एक महिन्यासाठी सुट्टीचा अर्ज केला, पण त्याला तेव्हा नोकरीवरूनच काढून टाकण्यात आलं. रजत हा फार जबाबदार व्यक्ति आहे, त्याचा पाठिंबा नसता तर मी मुंबईत एक महिना एकटी राहुच शकले नसते.”