‘धडक’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी श्रीदेवींची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहे. तिने अल्पावधीत आपल्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता एका दमदार भूमिकेत जान्हवी कपूर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘उलझ’ असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव असून नुकताच चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षभरापासून जान्हवी कपूर ‘उलझ’ चित्रपटाच्या चित्रीकरणासंदर्भात अपडेट देत होती. चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. आता तिच्या ‘उलझ’ चित्रपटाच्या टीझरसह प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

हेही वाचा – सुधीर फडके यांचं ‘हे’ गाणं ऐकून रडले होते लालकृष्ण अडवाणी, राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग

‘उलझ’ या चित्रपटात जान्हवी कपूरने भारतीय वन सेवा अधिकारीच्या (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर -IFS) भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा देशभक्तीवर आधारित असून तरुण मुत्सद्दी सुहानाच्या (जान्हवी कपूर) भोवती फिरणारी कथा आहे. ‘उलझ’ चित्रपटात सुहाना देश आणि तिच्या विरोधात रचलेल्या कट उधळवताना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – Video: अडीच वर्षांनंतर मुग्धा वैशंपायनने स्वतः संगीतबद्ध केलेलं ‘राघवा रघुनंदना’ गाणं प्रदर्शित, ‘असं’ झालं चित्रीकरण

जान्हवीच्या या आगामी चित्रपटाचा टीझर सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. टीझरची सुरुवात ‘सारे जहाँ से अच्छा’ गाण्याच्या म्युझिकने होते. त्यानंतर जान्हवीच्या एका संवादने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “गद्दारी केल्याचा बदला फक्त प्राणाने घेतला जाऊ शकतो. प्राण देऊन किंवा प्राण घेऊन,” असं जान्हवी कपूर म्हणताना दिसत आहे. टीझरच्या शेवटी जान्हवी अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे.

दरम्यान, ‘उलझ’ या चित्रपटात जान्हवी व्यतिरिक्त गुलशन देवैया, रोशन मैथ्यू, राजेश तैलंग, मियांग चांग, सचिन खेडेकर, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सुधांशू सरिया यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ५ जुलैला ‘उलझ’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspense and thrill janhvi kapoor ulajh movie teaser released pps