अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत असते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती अनेकदा अडचणीमध्ये सापडली आहे. स्वरा सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. राजकारणावर केलेल्या विधानांमुळे तिला मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल केले जाते. स्वराने ट्विटरवर एका राजकीय सभेतला फोटो पोस्ट केला आहे. या ट्विटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
राहुल गांधींच्या पक्षाची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान वेगवेगळ्या शहरांमध्ये भव्य सभांचे आयोजन केले जात आहे. राहुल गांधींचा या यात्रेतला मुक्काम सध्या दक्षिण भारतातल्या कर्नाटक राज्यामध्ये आहे. दरम्यान त्यांनी कर्नाटकमधील म्हैसुर शहरामध्ये सभा घेतली होती. ही सभा सुरु असताना अचानक पाऊस पडायला लागला. पावसासाठी कोणतीही उपाययोजना नसल्यामुळे राहुल गांधी यांनी भर पावसामध्ये भिजत उपस्थित जनतेसमोर भाषण केले. भाषण करताना त्यांनी ‘ही भारत जोडो यात्रा कोणीही थांबवू शकत नाही’ असे म्हटले. त्यांच्या या सभेतील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
राहुल गांधी यांच्या पावसामध्ये भिजत भाषण करण्याच्या कृतीवर अनेकांनी त्यांना पाठिंबा दाखवत त्यांचे कौतुक केले आहे; तर काहींनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे. याबाबत राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री स्वरा भास्करने देखील या घटनेवर मत मांडले आहे. तिने ट्विटरवर या सभेतील फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये राहुल गांधी भर पावसात माईकसमोर उभे राहून भाषण देत आहेत असे दिसत आहेत. या ट्वीटच्या कॅप्शनमध्ये स्वराने त्यांच्यासाठी शायरी लिहिली आहे. या फोटोवर “शानदार फोटो! फोटोग्राफर कोण आहे? ‘सदियों रहा है दुश्मन दौर ए ज़मां हमारा, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी।’ मूव्हमेंट” असे लिहिले आहे.
या फोटोप्रकरणामुळे ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. पोस्ट केलेल्या फोटोमुळे स्वरा भास्करला ट्रोल करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा ‘जहां चार यार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आली नाही. प्रेक्षकांनी स्वराच्या या चित्रपटाकडे पाठ फिरवली होती.