‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एकीकडे दीपिकाने या गाण्यामध्ये घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे तर दुसरीकडे दीपिकाला काही लोक समर्थनही देताना दिसत आहेत. ज्यात अभिनेत्री स्वरा भास्करचा समावेश आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ‘बेशरम रंग’ गाण्यातील दृश्य आणि कपडे यात बदल न केल्यास मध्य प्रदेशमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन स्वराने त्यांना टोला लगावला आहे.
स्वरा भास्करने एका बातमीचा स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यात दीपिका आणि शाहरुख यांच्या गाण्यावरून सुरू झालेल्या वादानंतर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. नरोत्तम मिश्रा यांनी ‘पठाण’च्या ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोणने घातलेली भगव्या रंगाची बिकिनी आणि काही दृश्यांवर आक्षेप घेतला होता. स्वरा भास्करने यावरून नरोत्तम मिश्रा यांना त्यांचं नाव न घेता टोला लगावला आहे.
स्वरा भास्करने ‘पठाण’ वादावर प्रतिक्रिया देताना आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, “भेटा आमच्या देशातील सत्ताधारी नेत्यांना. अभिनेत्रींचे कपडे पाहून वेळ मिळाला तर काय माहीत ते काही कामही करतील.” स्वरा भास्करचं हे ट्वीट सोशल मीडियावर बरंच चर्चेत आहे. या ट्वीटमुळे आता या वादाला नवं वळण मिळू शकतं असंही बोललं जात आहे.
दरम्यान ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम’ रंग हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. या गाण्यावर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी या गाण्यात बरेच बदल करण्याची मागणी केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, “गाण्यात दाखवण्यात आलेल्या कपड्यांवर माझा आक्षेप आहे. हे गाणं पूर्णतः दूषित मानसिकतेने शूट करण्यात आलं आहे. यातील सीन आणि कपड्यांचे रंग बदलले जायला हवेत अन्यथा हा चित्रपट मध्य प्रदेशमध्ये प्रदर्शित केला जावा की नाही याचा विचार करावा लागेल.”