अभिनेत्री स्वरा भास्कर(Swara Bhasker) ही तिच्या चित्रपटांसाठी जितकी ओळखली जाते, तितकीच ती तिच्या परखड व स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अभिनेत्री अनेकदा विविध विषयांवर पोस्ट करीत सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसते. आता स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण तिने शेअर केलेली पोस्ट ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वरा भास्कर काय म्हणाली?

स्वरा भास्करने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले, “चेंगराचेंगरी व गैरव्यवस्थापनामुळे भयानक मृत्यू होतात. ते मृतदेह जेसीबी बुलडोझरने काढले जात असल्याचा आरोप होतो. यापेक्षा, जो समाज चित्रपटात दाखवलेला ५०० वर्षापूर्वीच्या हिंदूंचा छळ पाहून भावुक होतो, तो समाज बुद्धीने आणि आत्म्याने मृत पावलेला समाज आहे”,असे म्हणत स्वरा भास्करने तिचे मत व्यक्त केले आहे.

महाकुंभमेळ्यात आतापर्यंत कोट्यवधी भाविक हजेरी लावली आहे. या कुंभमेळ्यात काही ठिकाणी आग लागल्याचे तसेच चेंगराचेंगरी झाल्याचा घटना घडल्या. अशा दुर्घटनेत अनेक नागरिकांनी जीव गमावल्याचे समोर आले.

याबरोबरच, छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित छावा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांची कारकिर्द तसेच औरंगजेबाने कसा छळ केला, हे पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर चाहते भावुक झाल्याचे प्रतिक्रियेमधून दिसत आहे. यामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. सोशल मीडियावर छावा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक चाहते भावुक झाल्याचे दिसत आहे. तर काहींनी संभाजी महाराजांचा जो छळ केला, त्याबद्दल संताप व्यक्त केल्याचेही पाहायला मिळत आहे. चाहत्यांसह अनेक कलाकारांना ही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी विकी कौशलच्या अभिनयाचेही कौतुक केले आहे. आता मात्र स्वरा भास्करने केलेली पोस्ट चर्चेत येत आहे.

शिवाजी सावंत यांच्या छावा कांदबरीवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. विकी कौशलसह अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसत आहे. महाराणी येसूबाईंची भूमिका तिने साकारली आहे. तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना दिसत आहे. पाच दिवसात या चित्रपटाने १७० कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता हा चित्रपट आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.