इस्रायलकडून सातत्याने गाझा पट्टीवर हल्ले सुरु झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण जग हादरले आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री स्वरा भास्करनेही (Swara Bhaskar) सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत तिने इस्रायली हल्ल्यांचा निषेध केला आहे. तसंच गाझावरील हल्ल्यांबद्दल तिने आपले मत व्यक्त केलं आहे आणि या पोस्टमधून इस्रायल मानवजातीकडून मानवता हिरावून घेत असल्याचंही तिने म्हटलं आहे.
स्वराने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने पहिल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “मी दररोज तयार होते, मेकअप करते आणि सेल्फी पोस्ट करते, मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नात, मी माझ्या मुलीबरोबर खेळाच्या अनेक दिवसांचे आणि वाढदिवसाच्या पार्ट्यांचे फोटो काढते आणि रील बनवते. मी निरुपयोगी जीवनशैलीच्या पोस्ट स्क्रोल करते, इंटरनेटवर ज्या गोष्टींची मला गरज नाही अशा गोष्टी खरेदी करते. फक्त स्वतःचं मन वळवण्यासाठी. पण अत्याचारांचे चित्र माझ्या मनातून जात नाही.”
यापुढे तिने म्हटलं आहे की, “दररोज मी रडणारे पालक त्यांच्या मृत मुलांना हातात घेऊन उभे असलेले पाहते. ज्या मुलांचे शरीर इस्रायली बॉम्बने उडवले होते. कुठेतरी लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह घेऊन जात आहेत तर कुठेतरी एखाद्या व्यक्तीला तंबूत जिवंत जाळण्यात आले आहे. आपण मानवांचा नरसंहार, सर्वात भयानक युद्ध, घृणास्पद आणि अमानुषता आपल्या फोनवर लाईव्ह पाहत आहोत आणि आम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही.”
यापुढे ती म्हणाली की, “आपण सर्व हळूहळू मरत आहोत. इस्रायल केवळ गाझा आणि पॅलेस्टाईनचा नाश करत नाहीत, तर ते मानवतेपासून मानवता हिरावून घेत आहे आणि आपण मोबाईलवर स्क्रोल करण्यात किंवा इंटरनेटवर खरेदी करण्यात व्यस्त आहोत.” यानंतर तिने “मानवांना किंवा कोणत्याही सजीव प्राण्याला जिवंत जाळताना पाहणे सामान्य नाही. लोकांना जीवंत जाळणे सामान्य नाही. बाळांची कत्तल करणे सामान्य नाही” असं म्हटलं आहे.
तसंच यापुढे तिने “रुग्णालये, शाळा आणि नागरिकांवर बॉम्बस्फोट करणे सामान्य नाही. मुळात बॉम्बस्फोट सामान्य नाहीत. पाश्चात्य जगाने निर्माण केलेल्या या युद्धांबद्दल, त्यांनी निर्माण केलेल्या शस्त्रांबद्दल आणि त्यांनी केलेल्या नरसंहारांबद्दल काहीही ‘सामान्य’ नाही. आपल्या काळातील सर्वात भयंकर युद्धांबद्दल स्वतःला आंधळे बनवणं थांबवा” असं म्हणत याविरुद्ध आवाज उठवण्याचं आवाहनही केलं आहे. दरम्यान, स्वराची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.