अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी रजिस्टर्ड मॅरेज केलं. जानेवारी महिन्यात तिने फहादशी लग्न केलं, त्यानंतर गुरुवारी १६ फेब्रुवारी रोजी तिने व्हिडीओ शेअर करत याबद्दल माहिती दिली. तसेच त्याच दिवशी तिने साखरपुडा केला.
स्वरा व फहादच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दोघांच्या साखरपुड्याला सोनम कपूर, दिव्या दत्ता यांनाही हजेरी लावली होती. साखरपुड्यात स्वराने लाल साडी आणि ऑफ-व्हाइट ब्लाउज घातले होते, तर फहादने लाल नक्षीकाम असलेलं नेहरू जॅकेटसह सिल्कचा ऑफ-व्हाइट कुर्ता-पायजामा घातला होता.
स्वराने इंस्टाग्राम स्टोरीजवर तिच्या एथनिक लुकचे क्लोज-अप व्ह्यू शेअर केले आहेत. तसेच तिने परिधान केलेल्या साडीबद्दल माहितीही लिहिली. तिने एक सेल्फी शेअर करत ‘हा दिवस खूप मोठा होता!!!! आम्ही काही महिन्यांसाठी एवढी मोठी माहिती लपवून ठेवली. खरं तर माझ्यासारख्या ओव्हर शेअररसाठी ते लपवणं हे सर्वात कठीण काम होतं,’ असं स्वरा म्हणाली. यावेळी तिने नेसलेली साडी ही तिच्या आईच्या लग्नातली साडी असून ती जवळपास ४० वर्षांपूर्वीची असल्याचं स्वराने सांगितलं. यावेळी तिने पोस्टमध्ये अबू जानी संदीप खोसला यांचा उल्लेख केला आणि तिच्या लुकबद्दल त्यांचे आभार मानले.
दरम्यान, स्वराने ६ जानेवारी रोजी फहादशी स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार लग्न केलं आहे. आता हे दोघेही मार्च महिन्यात सर्वांच्या उपस्थितीत विधीवत लग्न करतील.