वीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा टीझर रविवारी २८ मे रोजी प्रदर्शित करण्यात आला. या टीझरची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा मुख्य भूमिका साकारतोय, तसेच चित्रपटाचं दिग्दर्शनही तोच करतोय. टीझरमधील काही दाव्यांवर बंगाली व हिंदी अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने आक्षेप घेतला आहे.
वीर सावरकर हे सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आणि खुदीराम बोस यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांचे प्रेरणास्थान होते, अशी टॅगलाइन या टीझरमध्ये आहे. यावरून स्वस्तिकाने प्रश्न उपस्थित केले आहेत. ती ट्वीट करत म्हणाली, “खुदीराम बोस यांचे १८ व्या वर्षी निधन झाले. याआधी त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्याची प्रेरणा कोणी दिली? आणि नेताजी कोणातरीमुळे प्रेरित झाले म्हणून ते नेताजी झाले? आणि भगतसिंग यांचा इतिहास आपल्या सर्वांना आधीच माहीत आहे. मग या प्रेरणादायी कथा कुठून येत आहेत?” असा प्रश्न तिने उपस्थित केला.
दुसऱ्या ट्वीटमध्ये स्वस्तिका म्हणाली, “सावरकर हे खुदीराम बोस यांच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठे होते. खुदीराम यांचं १९०८ मध्ये निधन झालं. सावरकरांनी १८५७ बद्दलचे त्यांचे पुस्तक १९०९ मध्ये प्रकाशित केले. ते त्या वेळेस लंडनमध्ये शिकत होते आणि कोणत्याही चळवळीत सहभागी झाले नव्हते. मी चुकत असल्यास मला दुरुस्त करा.”
“मला वाटत नाही की कोणालाही आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा किंवा आपल्या देशासाठी लढणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा अनादर करायचा आहे. माझा असा हेतू नक्कीच नाही, पण चित्रपट चालवण्यासाठी वापरण्यात आलेल्या अशा गोष्टींशी मी सहमत नाही. काही निवडक लोकांना उच्च आसनावर बसवणं गरजेचं नाही,” असं स्वस्तिका म्हणाली.
चित्रपटाच्या टीझरमध्ये करण्यात आलेल्या दाव्यामुळे स्वस्तिका मुखर्जी चांगलीच संतापली आहे. तिने या दाव्यांवर आक्षेप नोंदवला आहे. फक्त चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालावा म्हणून या गोष्टी टीझरमध्ये लिहिल्या गेल्या आहेत, असा आरोप तिने केला आहे.