बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू बॉयफ्रेंड मॅथियस बोबरोबर काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकली. मित्रपरिवार आणि कुटुंबासमवेत दोघांनी गुपचूप लग्नसोहळा उरकला. सध्या इंटरनेटवर तापसीच्या लग्नाचीच चर्चां सुरू आहे. परंतु, तापसीनं यावर अद्याप काही भाष्य केलेलं नाही. अशातच अभिनेत्रीच्या लग्नातला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हारल होतोय. यावरून तापसीच्या लग्नाची बातमी खरी ठरली आणि चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला असं म्हणायला हरकत नाही.
लग्नानंतर तापसी पन्नूने पहिल्यांदाच मुलाखत दिली आहे. नुकत्याच एलेला दिलेल्या मुलाखतीत तापसी म्हणाली, “या क्षणी मला वाटतं की, माझ्या व्यावसायिक निवडी मोठ्या प्रमाणात माझ्या वेळेच्या मूल्यावर आधारित आहेत. मला खात्री करून घ्यायची आहे की, एखादा प्रोजेक्ट घेऊन मी माझा वेळ सत्कारणी लावत आहे की नाही. कारण कामाच्या पलीकडे जाऊन त्याचा मला आनंद घ्यायचा आहे. मला आजपासून माझ्या फिल्मोग्राफीची आवड जपायची आहे, म्हणून मला अशा कोणत्याही गोष्टीत वेळ वाया घालवायचा नाही, जिथे तो वेळ सत्कारणी लागत नसेल.”
तापसी पुढे म्हणाली, “तुमच्या आजूबाजूला नेहमीच असे लोक असतील, ज्यांच्याकडे तुमच्यापेक्षा काही गोष्टी जास्त किंवा कमी असतील. आयुष्याच्या शिखरावर उंच ठिकाणी पोहोचण्याच्या धडपडीत आपण हे विसरतो की असं केणतचं उंच ठिकाण आयुष्यात नसतं. मला हे जाणवलय की, माझ्या व्यवसायाच्या पलीकडे जीवनाचा आनंद घेणं जास्त महत्त्वाचं आहे. मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने जगायचा आहे आणि हे मला सुनिश्चित करायचे आहे.”
हेही वाचा… “मी जास्तीत जास्त २ हजार रुपये…” कपड्यांवर वायफळ खर्च करण्याबाबत मृणालने मांडलं मत, म्हणाली…
तापसी आणि मॅथियसने गुपचूप लग्न केल्यानंतर बुधवारी त्यांच्या लग्नातला पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये तापसी राजस्थानमधील उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकली. या व्हिडीओत अभिनेत्री वरमाला विधीसाठी लग्नमंडपात थाटामाटात एन्ट्री घेताना दिसली आहे.
लाल रंगाचा डिझायनर पंजाबी ड्रेस, डोळ्यावर गॉगल, लांबसडक वेणी, हातात लग्नाचा चुडा आणि मोठे कलीरे अशा खास अंदाजात तापसीने लग्नमंडपात एन्ट्री केली. मॅथियस बोनेदेखील या खास दिवशी पारंपरिक लूक केला होता. एकमेकांना वरमाला घातल्यानंतर या जोडप्यावर सगळ्यांनी फुलांची उधळण केली. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी अभिनेत्रीच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, अजूनही तापसीने लग्नाबाबत स्वत:हून कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
हेही वाचा… फॅशन आयकॉन सोनम कपूर तिच्या ड्रेसमुळे झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले, “चालता फिरता हॅंगर”
दरम्यान, तापसी माजी बॅडमिंटनपटू मॅथियस बोबरोबर जवळपास दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती आणि आता दोघं लग्नबंधनात अडकले आहेत. ‘न्यूज१८’ने दिलेल्या वृत्तानुसार तापसी आणि मॅथियसचा लग्नसोहळा २३ मार्च रोजी पार पडला. तापसीच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘डंकी’ या चित्रपटात तापसी पन्नू शाहरुखसह प्रमुख भूमिकेत दिसली होती.