बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत तिने बॉयफ्रेंड मॅथियस बोशी लग्न केल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. परंतु, यावर तापसीने कुठेही अधिकृतपणे भाष्य केलं नव्हतं. यामुळे नेमकं तिचं लग्न झालंय की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली होती. अशातच तिच्या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तापसी लग्नबंधनात अडकल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे.
जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये तापसी राजस्थानमधील उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकली आहे. वरमाला विधीसाठी अभिनेत्रीने लग्नमंडपात थाटामाटात एन्ट्री घेतली होती. लाल रंगाचा भरजरी पंजाबी ड्रेस, डोळ्यावर गॉगल, हातात लग्नाचा चुडा अशा खास अंदाजात तापसी मंडपात आली होती.
हेही वाचा : ईशा अंबानी-आनंद पिरामलचं आलिशान घर ‘या’ सेलिब्रिटी जोडप्याने घेतलं विकत, तब्बल ५०० कोटींचा केला करार
तापसी पन्नूने लग्नसमारंभात पंजाबी गाण्यावर एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं. नववधूच्या रुपात ती अतिशय सुंदर दिसत होती. तसेच मॅथियस बोने देखील यावेळी पारंपरिक लूक केला होता. एकमेकांना वरमाला घातल्यावर या जोडप्यावर सगळ्यांनी फुलांची उधळण केली. तापसीच्या लग्नातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अजूनही तापसीने लग्नाबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
हेही वाचा : नम्रता संभेराव अन् मुक्ता बर्वेची अनोखी जुगलबंदी! ‘नाच गं घुमा’चा टीझर प्रदर्शित, छोट्या मायराने वेधलं लक्ष
दरम्यान, तापसी माजी बॅडमिंटनपटू मॅथियस बोबरोबर जवळपास दहा वर्षांपासून रिलेशनशिप होती. आता या जोडप्याने लग्न केलं आहे. अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लों हे दोघे तिच्या लग्नाला उपस्थित होते. याआधी ‘न्यूज18’ने दिलेल्या वृत्तानुसार तापसी आणि मॅथियसचा लग्नसोहळा २३ मार्च रोजी पार पडला आहे. आता तापसी अधिकृतपणे लग्नाची घोषणा केव्हा करणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.