बॉलीवूडमध्ये असे काही कलाकार आहेत; ज्यांची जोडी चित्रपटगृहात प्रेक्षकांना गर्दी करण्यास भाग पाडते. अनेकदा चित्रपटांशिवाय हे कलाकार खऱ्या आयुष्यातदेखील एकत्र दिसतात. अशा कलाकारांपैकीच अजय देवगण आणि तब्बू यांची जोडी आहे. या दोघांच्या मैत्रीच्या चर्चा कायम रंगताना दिसतात. अजय देवगण आणि तब्बू यांनी अनेक वेळा एकत्र काम केले आहे. आता ते औरो में कहाँ दम था या त्यांच्या दहाव्या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. आता तब्बूने एका मुलाखतीदरम्यान, विजयपथ या चित्रपटाच्या सेटवर अजय देवगण इतरांच्या कशा खोड्या काढायचा. तिला त्याच्या वडिलांपासून हे लपवून ठेवायला लागायचे. यासंबंधीची आठवण तिने सांगितली आहे.
तब्बूने अजय देवगणबरोबरच्या मैत्रीबद्दल बोलताना म्हटले होते की, तो माझ्या भावाचा मित्र होता आणि त्यामुळे आम्ही एकमेकांना वयाच्या १२ व्या वर्षापासून ओळखतो. आम्ही एकत्र मोठे झालो आहोत. लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीत तिने म्हटले होते की, आमची मैत्री इतक्या वर्षांनंतरही टिकून आहे. कारण- ती चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली नव्हती.
बालपणीच्या या दोन मित्रांनी ‘विजयपथ’ चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले. तब्बूच्या अगोदर दिव्या भारती या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार होती. मात्र, १९९३ ला तिचे अचानक निधन झाल्याने ही भूमिका तब्बूला मिळाली. या चित्रपटाने तब्बूला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. त्याबरोबरच या चित्रपटाने अजय देवगणचे करिअर सावरण्यासही हातभार लावला. कारण- १९९३ साली त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकले नव्हते; परंतु ‘विजयपथ’ चित्रपटामुळे त्याच्या करिअरने नवी उंची गाठली आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला होता.
काय म्हणाली तब्बू?
‘विजयपथ’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची आठवण सांगताना तब्बूने म्हटले आहे की, अजय सर्वांच्या खोड्या काढण्यात तरबेज होता. तिने एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते की, अजय देवगणचे वडील वीरू देवगण या चित्रपटाचे अॅक्शन डायरेक्टर होते. मला अजयमुळे अनेकदा त्यांच्याकडून बोलणी खावी लागली आहेत. अजय लोकांच्या खोड्या काढण्यात तरबेज होता. वीरू देवगण यांना वाटायचे की, अजय जे काही करतो, ते मला सगळे माहीत आहे. ते मला फोन करून म्हणायचे, “तुम्हा लोकांना सगळं माहीत आहे; पण तुम्ही मला सांगत नाही. पण, माझ्याकडे पर्याय नसायचा. मला त्याच्या सगळ्या चुका, खोटं लपवायला लागायचे.”
पुढे बोलताना ती म्हणते की, ‘विजयपथ’चे शूटिंग करताना फक्त मजा-मस्तीच नव्हती. रुक रुक रुक या गाण्याचे कर्नाटकमध्ये शूटिंग सुरू होते. त्यादरम्यान माझ्या पायाला लागले. त्या वेदनेतच मी गाण्याचे शूटिंग पूर्ण केले, अशी आठवण तिने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती.
तब्बूने अनेकदा अजय देवगणशी असलेल्या मैत्रीबद्दल बोलताना म्हटले आहे की, तो कधीही तुमच्यावर त्याचे निर्णय लादत नाही. तो दुसऱ्यांना ते आहेत तसे स्वीकारतो. तुम्ही करीत असलेल्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करीत नाही. तुम्ही दुसरे कोणीतरी असण्याची तो मागणी करीत नाही. ही त्याच्या स्वभावाची खासियत आहे.
‘हकीकत’, ‘ठक’, ‘दृश्यम’, ‘फितूर’, ‘गोलमाल अगेन’, ‘दे दे प्यार दे’, ‘दृश्यम 2’ या चित्रपटांत अजय देवगण व तब्बू यांनी एकत्र काम केलेले आहे. आता ते औरो में कहाँ दम था या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. येत्या शुक्रवारी हा सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.