Tabu Birthday Special: आज अभिनेत्री तब्बूचा वाढदिवस. खरं तर मी तब्बूचा पहिला चित्रपट पाहिला होता तो म्हणजे ‘हम साथ साथ है’. खेड्या-पाड्यांमध्येही ब्लॅक अँड व्हाइट टीव्हीची जागा रंगीत टीव्ही घेऊ लागली होती. तेव्हा टीव्हीवर वीकेंडला हा चित्रपट कोणत्या तरी चॅनलवर नक्कीच लागलेला असायचा. आलोक नाथ यांनी साकारलेले रामकिशन व त्यांची तीन मुलं विवेक (मोहनीश बेहेल), प्रेम (सलमान खान), विनोद (सैफ अली खान) होती. यात विवेकची पत्नी साधनाची भूमिका तब्बूने साकारली होती. घरातली मोठी सून, सोज्वळ, सुसंस्कृत, समजदार अन् सर्वांना सांभाळून घेणारी साधना. हा एक पूर्णपणे कौटुंबीक चित्रपट होता.

Tabu Birthday : तब्बूसाठीच लिहिला गेला होता ‘चांदनी बार’, तिच्या करीअरला कलाटणी देणारा किस्सा!

या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं, त्याप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आपल्या पालकांचं महत्त्वाचं स्थान असतं. किंबहुना मुलांसाठी त्यांचे आई-बाबा त्यांचं जग असतात. आईच्या मायेबद्दल, प्रेमाबद्दल कायम बोललं जातं. आई पहिली मैत्रीण, गुरू असते असं म्हणतात पण जीवनात बाबाही तितकाच महत्त्वाचा असतो. मायेचा हात डोक्यावर ठेवणारा, कुटुंबाला आधार देणारा बाप असतो. काहींना आई-बाबा दोघांचं प्रेम मिळतं, सहवास लाभतो पण काहींना मिळत नाही. या चित्रपटात वेगवेगळी नाती दाखवण्यात आली होती. यात आलोक नाथ यांनी साकारलेलं रामकिशन यांचं पात्र या चित्रपटाचा कणा होता. त्यांचं पत्नी व मुलांप्रती असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळालं होतं. पण खऱ्या आयुष्यात मात्र तब्बूला वडिलांचं प्रेम मिळालं नाही. वडील असूनही कधीच तिला त्यांचा सहवास लाभला नाही. याबाबत तिनेच खुलासा केला होता. त्याबद्दल जाणून घेण्याआधी थोडक्यात तब्बूबद्दल जाणून घेऊयात.

तब्बूचं बालपण

५२ व्या वर्षीही आपल्या दमदार अदाकारीने आणि सदाबहार सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या तब्बूचे खरे नाव तबस्सुम फातिमा हाश्मी आहे. तिचा जन्म ४ नोव्हेंबर १९७१ रोजी हैदराबादमध्ये एका मुस्लीम कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचं नाव जमाल अली हाश्मी आणि आईचे नाव रिजवाना होतं. लहानपणी तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. तिची आई शाळेत शिक्षिका होती आणि तिचे आजी-आजोबा निवृत्त प्राध्यापक होते. तब्बूचे शालेय शिक्षण हैदराबादेतील सेंट अॅन्स हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर ती १९८३ साली मुंबई आली. इथे सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये तिने २ वर्षे शिक्षण घेतलं. तब्बू सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी, तन्वी आझमी आणि बाबा आझमी यांची भाची आहे. तिला एक मोठी बहीण असून तिचे नाव फराह नाझ आहे. फराह ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होती.

तब्बूचा सिनेसृष्टीतील प्रवास

तब्बू १४ वर्षांची असताना तिने १९८२ साली आलेल्या ‘बाजार’ आणि १९८५ मध्ये ‘हम नौजवान’ चित्रपटात अगदी लहान भूमिका साकारल्या होत्या. तिने मुख्य अभिनेत्री म्हणून १९९१ साली दाक्षिणात्य सिनेमात पदार्पण केलं. तेलुगू चित्रपट ‘कुली नंबर १’ हा तिचा पहिला सिनेमा. त्यानंतर तीन वर्षांनी तिने ‘पहला पहला प्यार’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं. १९९४ मध्ये आलेल्या अजय देवगणच्या ‘विजयपथ’ चित्रपटाने तब्बूला खूप लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर तब्बूने अनेक हिट सिनेमे दिले आणि करिअरमध्ये मागे वळून पाहिलं नाही.

तब्बूच्या गाजलेल्या भूमिका

तब्बूच्या करिअरवर नजर टाकताना तिने वठवलेल्या काही भूमिकांचा उल्लेख वगळून चालणारच नाही. ‘अस्तित्व’, ‘चांदनी बार’, ‘मकबूल’, ‘चिनी कम’, ‘माचीस’ आणि अलीकडच्या काळात आलेले ‘अंधाधून’, ‘दृश्यम’, ‘भूलभुलैया २’ व ‘भोला’ यामधील भूमिकांना तिने आपल्या अप्रतिम सहज अभिनयाने पुरेपूर न्याय दिला आहे. ‘मकबूल’मध्ये तिने इरफान खानबरोबर जबरदस्त काम केलंय. इरफानबद्दल म्हटलं जातं की त्याचे डोळे प्रचंड बोलके आहेत, तसा अभिनय सर्वांना शक्य नाही. पण ‘मकबूल’मध्ये इरफानइतकाच तोडीचा अभिनय तब्बूचाही आहे. दोन दिग्गजांना या सिनेमात पाहणं म्हणजे पर्वणी आहे. ‘चांदनी बार’, ‘चिनी कम’, ‘माचीस’ यातील तिचं काम म्हणजे कमालच. ‘अंधाधून’मध्ये पहिला हाफ आयुष्मान खुराना व राधिका आप्टे गाजवतात. पण तब्बूच्या एंट्रीनंतर मात्र या दोन्ही कलाकारांना विसरायला होतं, इतका भाव ती एकटीच खाऊन जाते. ‘दृश्यम’, ‘दृश्यम २’, ‘भोला’ यासारख्या चित्रपटात तिने पोलिसांच्या भूमिका उत्तम केल्यात. नुकत्याच आलेल्या ‘खुफिया’मध्ये तिने एजंटची भूमिका इतकी अप्रतिम साकारली आहे की ती पूर्ण चित्रपटात लक्षात राहते.

तब्बूचं वैयक्तिक आयुष्य व वडिलांशी नसलेलं नातं

सिमी गरेवालला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत तब्बूने तिच्या बालपणाबद्दल सांगितलं होतं. “माझं बालपण हैदराबादमध्ये खूप चांगलं गेलं. माझ्या पालकांचा घटस्फोट झाल्यानंतर मी माझ्या आईच्या पालकांबरोबर राहिले. आजीबरोबर राहिल्याने पुस्तक वाचनाची सवय लागली. मी खूप कमी बोलायचे, अभिनेत्री झाल्यानंतरही सुरुवातीचा काही काळ मी खूप कमी बोलायचे,” असं तब्बू म्हणाली. हाश्मी कुणाचं नाव आहे, असं विचारल्यावर ती म्हणाली, “हे माझ्या वडिलांचं नाव आहे. पण माझ्या वडिलांचं नाव वापरणं गरजेचं आहे, असं मला कधी वाटलंच नाही. शाळेतही माझं नाव तबस्सुम फातिमाच होतं. शाळेत फातिमा हेच माझं आडनाव होतं. मी तीन वर्षांची असताना माझ्या पालकांचा घटस्फोट झाला. मी कधीच बाबांच्या संपर्कात नव्हते. मी त्यांना कधीच पाहिलेलं नाही, माझ्या त्यांच्याबरोबरच्या कोणत्याच आठवणी नाहीत.” त्यांनी कधी तुझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? यावर ती म्हणाली, “नाही. पण माझी बहीण त्यांना भेटली होती. मला त्यांच्याबद्दल काहीच आठवत नाही, त्यामुळे कधीच भेटावसं वाटलं नाही. मला त्यांच्याबद्दल काही जाणून घ्यावंही वाटलं नाही. मी ज्या पद्धतीने मोठे झाले, त्यात आनंदी आहे. मी माझ्या आयुष्यात, माझ्या आई व बहिणीबरोबर स्थिरावले आहे. वडिलांचं दुसरं लग्न झालंय, त्यांना दोन मुली आहेत,” असा खुलासा तब्बूने केला होता.

सक्षम महिला असलेल्या कुटुंबात वाढली तब्बू

तब्बू म्हणाली की माझ्या घरातील महिला खूप सक्षम होत्या. माझी आई शिक्षिका, आजी प्राध्यापक, माझ्या इतर महिला नातेवाईकही काम करायच्या. दरम्यान, घरात फक्त महिलांमध्ये मोठं झाल्याने पुरुषांना समजून घेण्यात अडचणी येतात का? असा प्रश्न तिला सिमी गरेवालने विचारला. त्यावर नाही असं उत्तर देत तब्बू म्हणाली, “मला नाही वाटत की मला कधी अशा अडचणी आल्या. किंबहुना पुरुषांना सक्षम महिला, नोकरी करणाऱ्या महिला स्वीकारणं जड जातं. कारण त्यांना बाई म्हणजे गृहिणी असं अपेक्षित असतं. ते स्वतःला त्यांना हवं ते सगळं पुरवणारे समजतात.”

तब्बू व नागार्जुनचे प्रेम प्रकरण

५२ वर्षांची तब्बू अविवाहित आहे, पण एकेकाळी तिच्या प्रेम प्रकरणाची खूप चर्चा होती. ती विवाहित नागार्जुनच्या प्रेमात पडली होती. असं म्हणतात की नागार्जुन आणि तब्बू यांची ओळख एका चित्रपटाच्या शुटिंगवेळी झाली. एकत्र काम करताना ते ऐकमेकांच्या प्रेमात पडले. पण नागार्जुन विवाहित होता. त्याने तब्बूला स्वत:च्या घराजवळ घर घेऊन दिलं होतं, असंही म्हटलं जातं. दोघे १० वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. नागार्जुनला पत्नीला घटस्फोट न देता तब्बूबरोबर प्रेम प्रकरण चालू ठेवायचं होतं, पण तब्बूला मात्र हे मान्य नव्हतं. अखेर दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि ते वेगळे झाले, त्यानंतर तब्बूने लग्न केलं नाही.

जवळपास ३० वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या अफलातून अभिनेत्रीला वाढदिवस खूप खूप शुभेच्छा!

Story img Loader