बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी, निर्माती व लेखिका तहिरा कश्यपला पुन्हा कर्करोगाचे निदान झाले आहे. ४२ वर्षीय तहिराला २०१८ साली पहिल्यांदा स्तनाचा कर्करोग झाल्याचे आढळले होते. काही दिवसांपूर्वीच तिने याबद्दलची माहिती सोशल मीडियामार्फत शेअर केली होती. तेव्हा ती तिच्या कर्करोगाच्या प्रवासाविषयी मोकळेपणाने बोलताना दिसली.

७ एप्रिल रोजी सोशल मीडियावर पोस्ट करीत तहिराने याबाबत बोलताना, “सात वर्षांच्या नियमित तपासणीची शक्ती. खरं तर हा एक दृष्टिकोन आहे. ज्यांना नियमित मॅमोग्रामची गरज आहे, त्या सर्वांना मी हेच सुचवेन. माझ्यासाठी दुसरा राउंड… मला पुन्हा कर्करोगाचं निदान झालंय”, असे म्हटले होते. या पोस्टखाली कलाकार, तसेच नेटकऱ्यांनी तहिराचे कौतुक करीत तिला प्रोत्साहन दिले होते.

अशातच आता तहिराने पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत तिच्या कामाबद्दल अपडेट दिली आहे. तहिराने लॅपटॉप हातात असतानाचा तिचा फोटो शेअर केला आहे. फोटोत लॅपटॉपमध्ये ती चित्रपटाची स्क्रिप्ट लिहीत असल्याचे पाहायला मिळतेय. तर या फोटोला तहिराने लाईफ ‘अपडेट’ अशी कॅप्शन दिली आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तहिराने तिच्या मनातील भावना लिहिल्या असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये तिने देवाचेही आभार मानल्याचे पाहायला मिळते. तिने देवाचे आभार मानले असून, पुढे, “मला पुन्हा एकदा स्वत:ला नव्यानं भेटण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद! पुन्हा आयुष्य जगण्यासाठी, पुन्हा एकदा काम करण्यासाठी मी तयार आहे”, असे लिहिले आहे. शेवटी तिने “पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त” असे लिहिलेले पाहायला मिळते. तहिराने केलेल्या या पोस्टखाली अभिनेत्री सोनाली बेंद्रे, भूमी पेडणेकर, आयुष्मान खुराना यांनी कमेंट्समध्ये तिचे कौतुक केले आहे.

दरम्यान, तहिरा एक निर्माती, लेखिका व दिग्दर्शिका असून तिने ‘शर्माजी की बेटी’, ‘पिनी’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर नुकतीच तिने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळते.