ऑक्टोबर २०२२ मध्ये आयुष्मान खुरानाचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. आयुष्मानसह या चित्रपटामध्ये रकुल प्रीत सिंह, शैफाली शहा आणि शिबा चड्डा यांनी काम केले होते. यंदाच्या दिवाळीमध्ये त्याने शानदार पार्टीचे आयोजन केले होते. त्याचे अनेक सहकलाकार या पार्टीला हजर होते. आयुष्मान आणि त्याची पत्नी ताहिरा यांनी मिळून या पार्टीची तयारी केली होती. १ नोव्हेंबर रोजी आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप यांचा लग्नाचा वाढदिवस होता. या निमित्ताने ताहिराने दिवाळी पार्टीमधला एक फोटो पोस्ट केला होता.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने “लग्नाच्या विधीवत शुभेच्छा. माझ्यासाठी तू गायलेलं पहिलं गाणं अजूनही माझ्या मनात आहे. आज हॅलोविन आहे आणि आम्ही लग्न करण्यासाठी इतका भयानक दिवस निवडला होता हे मला आत्ताच कळलं. आज सर्व गोष्टींचा संबंध लागत आहे”, असे लिहिले आहे. १ नोव्हेंबरच्या ऐवजी तिने ३१ ऑक्टोबर रोजी हा फोटो पोस्ट केल्याने त्यांचे मित्र ताहिराला चिडवायला लागले.
त्यानंतर तिने पोस्ट केलेला फोटो पुन्हा इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. या फोटोवर तिने ‘ज्यांना वाटतं की माझी स्मरणशक्ती कमी आहे, त्यांच्यासाठी सूचना आहे. रोहिनी महाजन या माझ्या मैत्रिणीने मला माझ्या लग्नाचा वाढदिवस आज नसून उद्या आहे याची आठवण करुन दिली. आता उद्या हा फोटो पुन्हा पोस्ट करावा लागणार आहे म्हणून तो मी काढणार नाही. आयुष्मान मला माफ कर. मी प्रयत्न केला’, असे लिहिले आहे. त्यानंतर आयुष्मानने बरोबर दुसऱ्या दिवशी इन्स्टाग्रामवर त्यांचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये ‘आज आहे लग्नाचा वाढदिवस’, असे लिहून ताहिराला चिडवले.
आणखी वाचा – “कॉफी विथ करण ते सी-लिंक…” माहेरी आलेल्या प्रियांका चोप्राने शेअर केल्या मुंबईतील आठवणी
आयुष्मान खुरानाचा ‘ड्रिम गर्ल’ हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटाचा सिक्वेल पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो सध्या या चित्रपटाच्या कामांमध्ये व्यग्र आहे. ‘ड्रिम गर्ल २’ मध्ये त्याच्यासह अनन्या पांडे दिसणार आहे.