चित्रपटातील इंटीमेट सीन्सची बरीच चर्चा होते. काही लोक या सीन्सचा प्रचंड विरोध करतात, पण चित्रपटातील कथेच्या गरजेनुसार ते सीन्स त्या चित्रपटात वापरले जातात. हे सीन शूट करताना बऱ्याचदा काही कलाकार वाहवत जाण्याचे किस्सेसुद्धा आपण ऐकले आहेत. नुकतंच एका राऊंडटेबल संभाषणात अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि भूमी पेडणेकर यांनी त्यांचा अनुभव शेअर केला आहे.
‘बॉलिवूड हंगामा’ने या वर्षातील उत्तम अभिनेत्रींना एकत्र घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या. याच संभाषणात तमन्ना आणि भूमी या दोघींनी सहभाग घेतला होता. चित्रपटातील इंटीमेट सीन्स चित्रित करणं आणि त्यासाठी एक वेगळा प्रशिक्षक नेमणं हे किती गरजेचं आहे याबद्दल या दोघींनी खुलासा केला.
आणखी वाचा : सलमानची एक झलक मिळवण्यासाठी भाईजानच्या घराबाहेर चाहत्यांची झुंबड; पोलिसांनी केला लाठी चार्ज
याविषयी बोलताना तमन्ना म्हणाली, “बरेच इंटीमेट सीन्स करताना पुरुष बऱ्याचदा अस्वस्थ असतात ही गोष्ट मी खूपवेळा अनुभवली आहे. नटसुद्धा एक माणूसच आहेत हे सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. बरेच पुरुष सहकलाकार थोडे लाजाळू असतात, अशा परिस्थितीत समोरच्या महिलेला नेमकं कसं वाटेल याचा ते जास्त विचार करतात. मी स्वतः माझ्यापेक्षा अस्वस्थ अशा नटांना पाहिलं आहे.”
याच गोष्टीबद्दल पुढे बोलताना भूमी पेडणेकरने तिचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली, “मी जेव्हा ‘लस्ट स्टोरीज’मध्ये काम करत होते तेव्हा मी प्रचंड नर्वस होते. तो केवळ इंटीमेट सीन नसून त्यात ऑर्गसमसुद्धा दाखवायचा होता. त्यावेळेस या सीन्ससाठी प्रशिक्षण देणारे प्रशिक्षकसुद्धा नव्हते. पण झोयाने मला आणि नीलला यामध्ये प्रचंड मदत केली. खोलीत बरीच लोक होती, माझ्या अंगावर कपडे बहुतेककरून नव्हतेच, ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या होत्याच पण मी आणि माझा सहकलाकार नील आम्ही दोघांनी बसून बोलून एकमेकांच्या मर्यादा आधीच ठरवल्या होत्या. त्यामुळे असे सीन करताना तुमचा सहकलाकार आणि दिग्दर्शक यांच्याबरोबर बसून चर्चा करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं.”