अभिनेत्री तमन्ना भाटिया ‘बाहुबली २: द कनक्लुजन’, ‘हमशकल’, ‘जेलर’, ‘स्त्री २’, अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिने क्रिप्टोकरन्सीमध्ये फसवणूक केल्यामुळे तिला समन्स बजावल्याच्या चर्चांना उधाण आले होते. २.४ कोटींच्या क्रिप्टोकरन्सीच्या फसवणूक प्रकरणात तमन्नाचा सहभाग असल्याने पुद्दुचेरी पोलिसांनी तिला समन्स बजावण्यात आल्याचे म्हटले जात होते. आता अभिनेत्रीने ही सर्व माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच चुकीची माहिती पसरवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ज्यांनी अशी चुकीची माहिती पसरवली आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचेदेखील अभिनेत्रीने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तमन्ना भाटियाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात अभिनेत्रीने असे म्हटले की, क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणामध्ये माझा सहभाग असल्याचा आरोप करणाऱ्या अफवा पसरवल्या जात आहेत, मी विनंती करते की असे कोणतेही खोटे, दिशाभूल करणारे अहवाल आणि अफवा पसरवू नयेत. माझी टीम योग्य कारवाई करण्यासाठी याची चौकशी करत आहे.

अनेक रिपोर्टसमध्ये असा दावा करण्यात आला होता की, तमन्ना आणि काजल अग्रवाल यांची पुद्दुचेरी पोलिसांकडून क्रिप्टोकरन्सी फसवणुकीच्या प्रकरणात चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. १२३ तेलुगुनुसार, पुद्दुचेरी येथील रहिवासी अशोकन यांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. कोइम्बतूर येथील एका कंपनीने त्यांना आणि त्यांच्या १० मित्रांना क्रिप्टोकरन्सी योजनेत गुंतवणूक करण्यास भाग पाडून २.४ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. समोर आलेल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले होते की, तमन्ना भाटिया या कंपनीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होती, तर काजल अग्रवाल त्याच कंपनीच्या दुसऱ्या कार्यक्रमाला उपस्थित होती. तमन्ना व काजल फक्त कंपनीच्या कार्यक्रमांना उपस्थित होत्या की त्यांचा फसवणुकीमध्ये काही सहभाग आहे, याबाबत पोलिसांनी या दोन्ही अभिनेत्रींकडून स्पष्टीकरण मागितल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले होते. मात्र, या प्रकरणावर पोलिसांनी कोणतेही भाष्य केले नाही.

तमन्ना भाटियाच्या कामाबद्दल बोलायचे तर अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या ‘स्त्री २’चा भाग होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले. श्रद्धा कपूर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली होती. आगामी काळात तमन्ना भाटिया ‘ओडेला २’ या चित्रपटात दिसणार आहे. अशोक तेजा दिग्दर्शित ‘ओडेला २’ हा चित्रपट संपत नंदी यांच्या २०२२ मध्ये आलेल्या ‘ओडेला रेल्वे स्टेशन’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात तमन्नासह हेबा पटेल आणि वशिष्ठ एन सिम्हा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.