अभिनेत्री तनुश्री दत्ताने राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीबरोबर एक पत्रकार परिषद घेतली. राखी सावंतने ‘मीटू’ मोहिमेदरम्यान तनुश्री दत्तावर अनेक आरोप केले होते. त्यानंतर आता राखी व आदिलचा वाद सुरू असताना ती आदिलला पाठिंबा देण्यासाठी समोर आली आहे. यावेळी राखीने आपले व्हिडीओ व्हायरल केले होते, त्यामुळे प्रचंड त्रास झाल्याचं तनुश्री म्हणाली. तसेच आदिलमुळे हिंमत मिळाली असल्याने इतक्या वर्षांनी आता समोर येऊन राखीबद्दल बोलत असल्याचंही तिने नमूद केलं.
राखी सावंतने आतापर्यंत पाच लग्नं केली आहेत, असा दावा तनुश्री दत्ताने केला. ती म्हणाली, “राखी सावंतला काहीतरी मानसिक आजार आहे. कारण ती ज्या प्रकारच्या गोष्टी माझ्याबद्दल बोलली होती, ते ऐकून मलाच धक्का बसला होता. कारण कोणतीच मुलगी दुसऱ्या मुलीबद्दल इतके वाईट विचार करूच शकत नाही आणि तिने फक्त विचारच केला नाही, तर बोललीसुद्धा. तिने पाच लग्नं केलीत, कधी कधी वाटतं माणूस एकदा चूक करेल, दुसऱ्यांदा करेल, पण तिसऱ्यांदा तरी सेटल होईलच. पण पाच लग्नं. मला वाटतं कदाचित तिला पुरुषांमध्ये इंटरेस्टच नाही.”
आदिल म्हणाला की पाचवं लग्नं माझ्याशी केलेलं तेही मोडलं आता सहाव्याची चर्चा सुरू आहे. त्यावर तनुश्री म्हणाली, “मला खरंच वाटत नाही की तिला पुरुष आवडतात. कारण तिने जशा गोष्टी माझ्याबद्दल केल्या, त्या फार विचित्र होत्या.” तर राखी या सगळ्या गोष्टी पैशांसाठी करत असल्याचं आदिलने म्हटलं.
आदिल खानने राखीमुळे पालकांना त्रास झाल्याचा खुलासा केला. “माझ्या आई-वडिलांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास राखीमुळे सुरू झाला आहे. तिने मला कोणतेही कारण नसताना तुरुंगात टाकले, तुम्ही सर्वजण माझ्या आई-वडिलांच्या स्थितीची कल्पना करू शकता जेव्हा त्यांना कळलं की मला तुरुंगात टाकण्यात आलंय. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, ती माझ्या आई-वडिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी खेळली,” असा आरोप आदिलने केला.