दिग्दर्शक ओम राऊतच्या बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान, सनी सिंग, देवदत्त नागे अशी तगड्या कलाकारांची फौज आहे. मराठमोळ्या ओम राऊतने या बिग बजेट चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्रीला महत्त्वाची भूमिका दिली आहे. या चित्रपटात शुर्पणखाची भूमिका मराठी अभिनेत्रीने साकारली आहे.
खरं तर या अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी ती ‘आदिपुरुष’ चित्रपटात झळकणार असल्याची माहिती दिली होती. पण, तिने तिच्या भूमिकेबद्दल कोणताही खुलासा केला नव्हता. तसेच निर्मात्यांकडूनही तिच्या भूमिकेबद्दल माहिती देण्यात आली नव्हती, त्यामुळे तिला शुर्पणखाच्या भूमिकेत पाहणं हे ‘आदिपुरुष’ पाहण्यासाठी गेलेल्या मराठी प्रेक्षकांसाठी सरप्राईज होतं. या चित्रपटात शुर्पणखाची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित होय.
मराठमोळ्या ओम राऊतने दिग्दर्शित केलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात मराठी अभिनेता देवदत्त नागे हनुमानाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून देवदत्त नागे ही भूमिका साकारत असल्याची प्रेक्षकांना कल्पना होती, तो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देखील हजर होता, पण तेजस्विनी पंडितच्या भूमिकेबद्दल मात्र निर्माते व खुद्द अभिनेत्रीनेही बोलणं टाळलं होतं. त्यामुळे तिला मोठ्या पडद्यावर महत्त्वाच्या भूमिकेत पाहून चाहते आनंद व्यक्त करत आहेत.