बॉलिवूडची बेबो, म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खानने ‘जब वी मेट’, ‘चमेली’, ‘थ्री इडियट्स’ या सिनेमांतून विविध भूमिका साकारून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तर ग्लॅमरस भूमिका करत तिने स्वतःचा एक प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. करीनाने बॉलिवूडमध्ये झिरो फिगरपासून ते स्टाईलचे अनेक ट्रेंड सेट केले आहेत. आता ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या सिनेमात ती पहिल्यांदाच गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार असून, याचा ट्रेलर लॉन्च सोहळा काल मुंबईत पार पडला. यात, सिनेमाच्या दिग्दर्शकाने करीना आपल्या इमारतीत राहूनसुद्धा आपल्याकडे दुर्लक्ष करत असे, हा किस्सा सांगितला आहे.
‘द बकिंगहॅम मर्डर्स’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंग सोहळ्याला या सिनेमाची निर्माती एकता कपूर, करीना कपूर खान आणि चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता उपस्थित होते. हा एक क्राईम थ्रिलर सिनेमा आहे. याच सोहळ्यात, करीना कपूर खानला या सिनेमात घेण्यासाठी हंसल मेहतांनी निर्माती एकता कपूरचे आभार मानले. हंसल मिश्कीलपणे म्हणाले की, एकता कपूर नसत्या, तर करीना कपूर खान आणि माझी भेटच झाली नसती. त्यांनी करीना कपूर खान आणि त्यांचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी मी आणि करीना एकाच इमारतीत राहत होतो. करीना एकदा नाताळ पार्टीला जात असताना, तिची आणि माझी भेट झाली. आमची नजरानजर झाली. मी तिथेच उभा होतो, पण करीना काहीही न बोलता लिफ्टमध्ये निघून गेली. हा किस्सा मिश्कीलपणे सांगितल्यानंतर, मात्र, हंसल यांनी करिनाचे कौतुकसुद्धा केले.
हंसल मेहता म्हणाले की, करीना एक गुणी अभिनेत्री आहे. तिच्या स्टारडममुळे अनेक चाहते सिनेमागृहापर्यंत येतात, असं असलं तरी काही तिने सिनेमात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे पुढील २५ किंवा ५० वर्ष तरी तिचं नाव लोकांच्या लक्षात राहील. स्टारडम बदलू शकते, पण प्रतिभा कधीच संपत नाही, असं म्हणत हंसल मेहता यांनी करीनाचं कौतुक केलं आहे.
निर्माती करीनाने केली दिग्दर्शकाची स्तुती
‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या सिनेमात करीना दोन नव्या भूमिकांत दिसणार आहे. करीना पहिल्यांदाच या सिनेमात गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार असून, तिने या सिनेमाची निर्मिती सुद्धा केली आहे. तिने एकता कपूरसह या सिनेमाची निर्मिती केली आहे. करिनाने या सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात हंसल मेहतावर स्तुतिसुमनं उधळली. करीना म्हणाली की, हंसलने सेटवरील वातावरण खूप छान ठेवलं. हंसल यांच्यापेक्षा उत्तम आशयघन सिनेमा कोणीही तयार करू शकत नाही. वास्तववादी सिनेमा ही त्यांची खासियत आहे. ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या सिनेमात करीनासोबत रणवीर ब्रार आणि अॅश टंडन दिसणार असून, हा सिनेमा १३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.