भारतातील ऐतिहासिक खटल्यांमध्ये शाहबानो बेगम विरुद्ध मोहम्मद अहमद खान हा सर्वात गाजलेला खटला आहे. १९८५ सालच्या या खटल्याची जबरदस्त चर्चा झाली होती, आजही या खटल्याचे उदाहरण बऱ्याच ठिकाणी दिले जाते. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पीडित घटस्फोटित मुस्लिम महिलेला तिच्या पाच मुलांसाठी पोटगी देण्यात यावी असे आदेश दिले होते.
आता या खटल्यावर लवकरच चित्रपट येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘द ट्रायल’ व ‘द फॅमिली मॅन’सारख्या सीरिजचे लेखक तर मनोज बाजपेयी यांच्या ‘सिर्फ एक बंदा काफी है’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुपर्ण वर्मा हे या गाजलेल्या केसवर चित्रपट घेऊन येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. सुपर्ण सध्या या खटल्यावर अभ्यास करत असून यासंदर्भात माहिती गोळा करत आहेत.
आणखी वाचा : श्रद्धा कपूर अडकणार लग्नबंधनात? ‘या’ लेखकाबरोबर अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा
भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील शाह बानो बेगम यांनी १९७८ मध्ये घटस्फोट घेतला होता व नंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. यावेळी त्यांनी आपल्या पतीकडून पोटगीची मागणी केली. हा खटला चांगलाच गाजला अन् प्रचंड वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी हा खटला जिंकला. आता चित्रपटाच्या माध्यमातून या खटल्याच्यामागील बऱ्याच गोष्टी समोर येणार आहेत.
सुपर्ण वर्मा यांच्या या चित्रपटात कोणते कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत याबद्दल अद्याप खुलासा झालेला नाही. परंतु या चित्रपटाच्या लिखाणाचे काम पूर्ण झाले असून लवकरच याचे चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रेक्षक या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. सुपर्ण यांनी अशाच वेगवेगळ्या विषयांवर आधीही चित्रपट केले आहेत, पण त्यांच्या आता या प्रोजेक्टसाठी प्रेक्षक तसेच बरेच सेलिब्रिटीजही उत्सुक आहेत.