भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘सर्वाधिक यशस्वी कुटुंब’ म्हणून कपूर कुटुंब ओळखले जाते. कपूर कुटुंबीय अनेक पिढ्यांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजवर प्रत्येक पिढीत एक तरी स्टार कपूर कुटुंबियाने दिला आहे. असं असलं तरी कपूर कुटुंबातील पहिला हिरो मात्र विस्मृतीत गेला. या लेखात आम्ही तुम्हाला कपूर कुटुंबातील त्या विस्मरणात गेलेल्या नायकाची कथा सांगणार आहोत.

त्रिलोक कपूर: कपूर कुटुंबातील विस्मृतीत गेलेला नायक

त्रिलोक कपूर हे कपूर कुटुंबातील पहिले प्रमुख नायक होते. त्यांचा जन्म १९१२ साली झाला होता. प्रथितयश अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे ते धाकटे बंधू होते. पृथ्वीराज कपूर जरी कपूर कुटुंबाचे आधारस्तंभ मानले जात असले तरी त्रिलोक कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीत पहिले ब्रेक मिळवणारे नायक ठरले. त्यांनी १९३३ मध्ये ‘चार दरवेश’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सीता’ या चित्रपटामुळे त्यांना पहिलं यश मिळालं.

हेही वाचा…बिग बॉस १६ फेम अभिनेत्री ‘हाऊसफुल ५’ मध्ये साकारणार मुख्य भूमिका; डेंटिस्ट असून केली पान मसाल्याची जाहिरात, ट्रोलिंगबद्दल म्हणाली…

भारतातील एक प्रसिद्ध चेहरा

१९३३ ते १९४७ या काळात त्रिलोक कपूर हे चित्रपटसृष्टीतील एक अग्रगण्य चेहरा बनले. त्या काळातील सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्रींबरोबर त्यांनी काम केले, त्यात नूरजहाँ, नलिनी जयवंत, सुशीला राणी पटेल, मिना शोरी आणि सुलोचना यांचा समावेश होता. त्यावेळी त्यांच्या लोकप्रियतेची तुलना अशोक कुमार आणि करण देवान यांच्याशी केली जात असे. तरीसुद्धा, अशोक कुमार, दिलीप कुमार यांच्याप्रमाणे ते सर्वसामान्य प्रेक्षकांच्या पसंतीस कधीच उतरले नाहीत.

दुसरी इनिंग: पौराणिक चित्रपटांचे यशस्वी तारे

१९५० च्या दशकात त्रिलोक कपूर यांनी पौराणिक चित्रपटांकडे वळण्याचा निर्णय घेतला. श्री राम भक्त हनुमान (१९४८) मध्ये त्यांनी भगवान रामाची आणि रामायण (१९५४) मध्ये भगवान शिवाची भूमिका साकारली. या चित्रपटांनी त्यांना नवीन ओळख दिली . या दशकात त्यांनी निरुपा रॉय यांच्याबरोबर भगवान शिव आणि पार्वतीची जोडी लोकप्रिय केली. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी ३० पेक्षा जास्त चित्रपटांत मुख्य भूमिकेत काम केले. मात्र, बहुतेक चित्रपट कमी बजेटचे असल्यामुळे त्रिलोक कपूरना सुपरस्टार म्हणून कधीही ओळख मिळाली नाही.

हेही वाचा…क्रिकेटपटू व्हायचं स्वप्न, पण झाला अभिनेता, वडिलांनी बॅटने दिलेला चोप; स्वतःच केला खुलासा

अखेरची वर्षे आणि निधन

१९७० नंतरच्या काळात त्रिलोक कपूर यांनी मोठ्या चित्रपटांत सहायक भूमिकांमध्ये काम केले. त्यांनी ‘सौदागर’, ‘दो प्रेमी’, ‘गंगा जमुना सरस्वती’ यांसारख्या चित्रपटांत भूमिका साकारल्या. १९८५ मध्ये राज कपूर यांच्या आरके फिल्म्सच्या ‘राम तेरी गंगा मैली’ मध्ये त्यांनी शेवटची प्रमुख भूमिका साकारली. १९८८ साली वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

हेही वाचा…Ghajini 2 : एकच सिनेमा, सारखेच पात्र, पण भूमिका साकारणार दोन अभिनेते; आमिर खान आणि दाक्षिणात्य स्टार ‘गजनी २’मध्ये दिसणार

कपूर कुटुंबाचा विस्मृतीत गेलेला हिरो

कपूर कुटुंबाच्या इतिहासात त्रिलोक कपूर यांचे नाव महत्त्वपूर्ण आहे. कपूर कुटुंबातील इतर सदस्यांनी नंतर स्टारडम मिळवले, पण त्रिलोक कपूर यांनी त्यांचे स्थान कायम ठेवले. त्यांच्या योगदानामुळे कपूर कुटुंबाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक आदराचे स्थान मिळवले.