IFFI Jury Head on The Kashmir Files: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावरुन पुन्हा वाद सुरू झाला आहे. गोव्यात सुरू असलेल्या इंटरनॅशन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI)मध्ये ज्युरींनी या चित्रपटावर टीका केली आहे. ज्युरी हेड व इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी हा चित्रपट ‘व्हल्गर’ व ‘प्रोपगंडा’ असल्याचं म्हटलं. त्यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नदाव लॅपिड यांनी काश्मीर फाइल्सबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी भाष्य केलं. त्यानंतर आता चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारलेल्या कलाकारानेही ज्युरींच्या वक्तव्यावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे. अभिनेता दर्शन कुमारने ज्युरींनी कश्मीर फाइल्सबाबत केलेल्या टिप्पणीवर नाराज असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा>> “हा प्रोपगंडा आणि वल्गर चित्रपट…” IFFI मध्ये मुख्य ज्युरींनीच साधला ‘द काश्मीर फाईल्स’वर निशाणा
दर्शनने ‘ईटाइम्स’शी बोलताना यावर भाष्य केलं. तो म्हणाला, “प्रत्येकाचं त्यांनी पाहिलेल्या गोष्टीबद्दल मत असतं. पण ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या परिस्थितीवर भाष्य करणारा आहे, हे सत्य आहे. ते अजूनही दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या क्रूर छळाविरोधात न्याय मिळवण्यासाठी लढत आहेत. त्यामुळे हा चित्रपट व्हल्गर नसून सत्य परिस्थितीवर भाष्य करणारा आहे”.
‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट मार्च २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. बॉलिवूडमधील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींहून अधिक गल्ला जमवला होता.