सध्या एकूणच बॉलिवूडविषयी सगळीकडेच नकारात्मक गोष्टी बोलल्या लिहिल्या जात आहेत. बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला तर गेल्या काही दिवसांत याचा चांगलाच अनुभव आला आहे. आमिरच्या चित्रपटाला ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी बॉयकॉट केलं ते पाहता बॉलिवूड पुन्हा असं काही करायचं धाडस करेल असं वाटत नाही. आमिरच्या चित्रपटावर काहींनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी प्रेक्षकांनी हा चित्रपट संपूर्णपणे नाकारला.

आता आमिर पुन्हा एका नवीन कारणामुळे ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या रडारवर आला आहे. आमिर आणि कियारा आडवाणी यांची ‘एयू बँक इंडिया’साठी केलेली एक जाहिरात सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या जाहिरातीमध्ये हिंदू समाजात मुलगी माहेरी सोडून सासरी जाण्याच्या प्रथेला छेद देत मुलगा घरजावई म्हणून मुलीच्या घरात गृहप्रवेश करतो असं दाखवण्यात आलं आहे. या जाहिरातीमुळे आमिर पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

आणखी वाचा : KBC 14 ला मिळाला दुसरा करोडपती; बिग बींनी घोषणा करताच स्पर्धकाला अश्रू अनावर

ही जाहिरात पाहून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी यावर भाष्य केलं आहे आणि आमिरसह एयू बँकेलाही चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. विवेक यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, “मला हे समजत नाही की धार्मिक आणि सामाजिक रूढी परंपरा बदलण्याची जबाबदारी बँकांनी कधीपासून घेतली? मला असं वाटतं की ‘एयू बँकेने’ भ्रष्ट बँकिंग यंत्रणेला सुधारण्याऐवजी अशाच भूमिका घ्याव्यात. ही लोकं असा काहीतरी मूर्खपणा करतात अन् मग म्हणतात की हिंदू आम्हाला ट्रोल करतात.”

आमिरच्या या जाहिरातीमुळे सध्या सोशल मीडियावर पुन्हा बॉयकॉट ट्रेंड जोर धरू लागला आहे. काही लोकांनी ही जाहिरात शेयर करत आमिरला प्रश्न विचारला आहे की, “तू हलाल प्रथेबद्दल कधी भाष्य करणार?” विवेक अग्निहोत्री यांच्या ट्वीटलाही लोकांनी शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही लोकांनी तर या बँकेलाच बॉयकॉट करायची मागणी केली आहे.

Story img Loader