‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर या चित्रपटामुळे चर्चेला नवा विषय मिळाला असून केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात आले या सत्यघटनेवर हा चित्रपट आधारलेला आहे. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर अदा शर्माच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले. अदा शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटाचे अनेक पोस्टर शेअर केले आहेत. अशाच एका पोस्टवर तिच्या चाहत्याने अदाला प्रश्न विचारला आहे.
अदा शर्माला कमेंटमध्ये विचारला प्रश्न
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत अदा शर्मा हिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “स्वातंत्र्याकडून…भितीकडे, स्मितहास्याकडून… शांतता, निरागसपणा ते दहशतवाद पडद्यामागचे सत्य समोर येणार…द केरळ स्टोरी सिनेमा ५ तारखेला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार.” तिच्या या इन्स्टा पोस्टच्या कमेंटमध्ये अदा शर्माच्या एका चाहत्याने तिला थेट प्रश्न केला आहे. “अदाजी, या सिनेमामध्ये हिरो कोण असेल कृपया मला उत्तर द्या” यावर अदा शर्मा हिने तिच्या चाहत्याला उत्तर दिले आहे.
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटामध्ये हिरो कोण असेल? या प्रश्नाला उत्तर देत अदा म्हणाली, “कहाणी, अर्थात या चित्रपटाची ‘कथा’ हीच चित्रपटाचा खरा हिरो असेल.” तिच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, या चित्रपटातील टीझर आणि ट्रेलरमध्ये दावा केल्याप्रमाणे अनेकांनी ३२ हजार स्त्रियांच्या धर्मांतर झाल्याच्या आकड्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कॉंग्रेस नेते शशी थरूर आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही ३२ हजार आकड्यावर आक्षेप नोंदवला असून याबाबत पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे. यावर चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, “२०१० मध्ये केरळमधील तत्कालीन मुख्यमंत्री ओमन चांडी सरकारच्या काळात एक रिपोर्ट समोर आला होता. यानुसार दरवर्षी २ हजार ८०० ते ३ हजार २०० मुली धर्मांतर करत असल्याचे सांगण्यात आले होते. ही आकडेवारी पाहिली असता १० वर्षांत धर्मांतर केलेल्या मुलींची संख्या ३० ते ३२ हजार असू शकते.” सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम या भाषांमध्ये ५ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.