‘द केरला स्टोरी’ हा बॉलिवूड चित्रपट सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. ५ मेला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासूनच कोटींची कमाई करायला सुरुवात केली. अवघ्या नऊ दिवसांत १०० कोटींची कमाई करणाऱ्या ‘द केरला स्टोरी’ने १२व्या दिवशी १५० कोटींचा आकडा पार केला. आता चित्रपटाच्या १३व्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अनेक राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदीही घालण्यात आली आहे. पण, तरीही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करत आहेत. ठिकठिकाणी या चित्रपटाचे शो हाऊसफूल होत आहेत. दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर ‘द केरला स्टोरी’चा बोलबाला पाहायला मिळत आहे. प्रदर्शनाच्या १३व्या दिवशीही या चित्रपटाने तगडी कमाई केली आहे.
हेही वाचा >> “पाल जिवंत झाली तर…”, कान्स फेस्टिव्हलमधील लूकमुळे उर्वशी रौतेला ट्रोल, नेटकरी म्हणाले, “ऋषभ पंतचा अपघात…”
‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने १२व्या दिवशी ९.८० कोटींचा गल्ला जमवत १५० कोटींचा आकडा पार केला होता. १३व्या दिवशी या चित्रपटाने ९.२५ कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १६५.९४ कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हेही वाचा>> सलमान खानची बहीण अर्पिताच्या घरी चोरी, पाच लाखांचे कानातले चोरणाऱ्या नोकराला अटक
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून कोटींची कमाई करणाऱ्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर २०२३ सालातील २०० कोटींचा विक्रमी आकडा पार करणारा ‘द केरला स्टोरी’ हा दुसरा चित्रपट ठरणार आहे.