‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून सध्या अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परंतु दुसरीकडे मात्र सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येत आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी जादुई आकडा गाठत १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली. यानंतर आता हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्यासाठी वाटचाल करत असून १७ व्या दिवशी चित्रपटाने १९८ कोटींची कमाई केली आहे.
हेही वाचा : ‘आर्या’ वेब सीरिजसाठी सुष्मिता सेन नव्हती पहिली पसंती, ‘या’ अभिनेत्रीने नकार दिला म्हणून…
‘द केरला स्टोरी’चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. पहिल्याच वीकेंडला या चित्रपटाने ३५.४९ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर १६ मे रोजी १५० कोटींचा टप्पा ओलांडल्यावर आता हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. ‘द केरला स्टोरी’ने एकूण १७ दिवसांमध्ये १९८.४७ कोटींचा व्यवसाय केला आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार हा चित्रपट सोमवारी २०० कोटींच्या क्लबमध्ये आरामात प्रवेश करू शकतो.
प्रदर्शित झाल्यावर तिसऱ्या वीकेंडला ‘द केरला स्टोरी’ने शुक्रवारी (१९ मे) ६.६० कोटी, शनिवारी (२०मे) ९.१५ कोटी आणि रविवारी (२१मे) ११.५० कोटींची कमाई करीत एकूण १९८.९७ कोटींचा गल्ला जमवला. यामध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
हेही वाचा : “प्रभू श्री रामाचे नाव ऐकून…,” अजय-अतुलने सांगितला ‘आदिपुरुष’च्या गाण्यांना संगीतबद्ध करण्याचा अनुभव
सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’चित्रपटावर अनेक राज्यांमध्ये बंदीही घालण्यात आली होती, तरीही बॉक्स ऑफिसवर चित्रपट कोटींची कमाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह-जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात आले या कथेवर हा संपूर्ण चित्रपट आधारलेला आहे, असा दावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला होता. यामुळे देशभरात या चित्रपटावरून वाद सुरू झाला होता, तर काहींनी चित्रपटाचे कौतुकही केले. या सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाला असून २०२३ मध्ये आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी ‘द केरला स्टोरी’ हा १०० कोटींची कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे. आता लवकरच या चित्रपटाचा २०० कोटींच्या क्लबमध्ये समावेश होईल असे आतापर्यंतच्या बॉक्स ऑफिस कलेक्शवरुन स्पष्ट होत आहे.