The Kerala Story Box Office Collection day 1: ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट काल ५ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून बराच वाद सुरू होता, त्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या चित्रपटातील ३२ हजार महिलांच्या धर्मांतराचे दावे खोटे आहेत, असं म्हणत अनेक राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही केली होती. या सर्व गदारोळात हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लोक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. अशातच चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत. ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, ‘द केरला स्टोरी’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ७.५ कोटींचा व्यवसाय केला आहे. ही अंदाजे आकडेवारी आहे, त्यामुळे अधिकृत आकडेवारी आल्यानंतर त्यात थोडा बदल होऊ शकतो. दुसरीकडे, काही विश्लेषकांच्या मते, चित्रपट वीकेंडमध्ये चांगले कलेक्शन करू शकतो.
दरम्यान, चित्रपटाला बराच विरोध होत होता. त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिकाही कोर्टांमध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका याचिकेवर सुनावणी करताना ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला. यावेळी केरळमधील ३२ हजारहून अधिक महिलांना ISIS मध्ये भरती करण्यात आल्याचा दावा करणारा चित्रपटाचा टीझर त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून काढून टाकला जाईल, असं आश्वासन निर्मात्याने उच्च न्यायालयाला दिलं.