सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडला असतानाच चित्रपटगृहांमध्ये एक वेगळाच दृष्टिकोन पाहायला मिळत आहे. ‘द केरला स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईत वाढ होताना दिसत आहे. सहाव्या दिवशीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
‘द केरला स्टोरी’ने पाच दिवसांत ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन सर्वात कमी होते, त्यानंतर हा आकडा वाढला आहे. सहाव्या दिवशी चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे. चित्रपटाने बुधवारी १२ कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने आत्तापर्यंत ६९.७६ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.३ कोटी, दुसऱ्या शनिवारी ११.१२ कोटी, तिसऱ्या दिवशी १६.४० कोटी, चौथ्या दिवशी १०.७ कोटी आणि पाचव्या दिवशी ११.१४ कोटींची कमाई केली.
सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या कथानकात केरळ राज्यातील मुलींची फसवणूक कशा पद्धतीने करण्यात आली होती, याचे वास्तव चित्रण दाखवण्यात आले आहे. केरळमधील दहशतवादी कटांवर आधारित हा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
एकीकडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे, दुसरीकडे यावरून वादही सुरू आहे. तमिळनाडूनंतर पश्चिम बंगालमध्येही चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे, तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणासारख्या राज्यांमध्ये तो करमुक्त करण्यात आला आहे.