विपुल अमृतलाल शाह दिग्दर्शित, सुदीप्तो सेन दिग्दर्शित अदा शर्माच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने अखेर २४व्या दिवशी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. सुदीप्तो सेन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा वादग्रस्त चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. चौथ्या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या कमाईत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या तीन दिवसांत चित्रपटाने जवळपास १०.५० कोटी रुपये कमावले आहेत. तर चित्रपटाची एकूण कमाई आता २०६ कोटींच्या आसपास पोहोचली आहे. स्पर्धेच्या कमतरतेचा फायदा हा या चित्रपटाला मिळाला आहे, तर कमल हसन ते अनुराग कश्यप यांनी या चित्रपटाला ‘प्रोपगंडा फिल्म’ म्हणत पुन्हा एकदा चर्चेत आणले आहे.
‘बॉक्स ऑफिस इंडिया’च्या वृत्तानुसार, ‘द केरळ स्टोरी’ने रविवारी ४.२५ कोटींचे कलेक्शन केले आहे. यापूर्वी शनिवारी ४ कोटी आणि शुक्रवारी २.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होऊन २४ दिवस झाले आहेत. तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस म्हणजेच गुरुवारपर्यंत चित्रपटाच्या कमाईत सातत्याने घसरण होत होती. पण वीकेंड येताच चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
रविवारीसुद्धा या चित्रपटासाठी लोकांनी तिकीटबारीवर गर्दी केली. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट केरळ राज्यातील मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर आणि ISIS सारख्या दहशतवादी संघटनांमध्ये त्यांची भरती या सत्यघटनेवर आधारित आहे. टीझर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. पश्चिम बंगालमध्येही या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, ती सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच रद्द केली. १५ ते २० कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. केवळ देशातच नव्हे तर जगभरात याची चर्चा होताना दिसत आहे.