‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आहे. ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना कसे दहशतवादी संघटनांमध्ये सामील करण्यात आले, ही कथा या चित्रपटामध्ये दाखवली गेली आहे. या कथेमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. या चित्रपटावरून संमिश्र प्रतिक्रिया येत असतानाच काल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार केला. यावर या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी दिलेली प्रतिक्रिया आता चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘द केरला स्टोरी’ हा एक प्रोपगंडा चित्रपट आहे, असे म्हणत अनेक राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. पण प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी या चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. यावर प्रतिक्रिया देत असताना सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “माझा नवरा मुस्लिम आहे आणि तो…,” ‘द केरला स्टोरी’ पाहून देवोलिना भट्टाचार्जीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “या चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली, याचा मला खूप आनंद होत आहे. माझ्याकडे अजून खूप कथा आहेत आणि माझे इतके कौतुक झाल्यानंतर मी आराम करू इच्छित नाही. मला माहीत होते हा चित्रपट यशस्वी होणार. मी गेली सात वर्षे या चित्रपटावर काम करत आहे.”

हेही वाचा : चित्रपटगृहानंतर ‘द केरला स्टोरी’ लवकरच येणार OTT वर! जाणून घ्या कधी, कुठे पाहता येणार चित्रपट

“ही कथा महिलांची आहे, पण पुरुषांबाबत या कथेमध्ये काही का दाखवण्यात आलेले नाही?” असे त्यांना विचारले गेल्यावर ते म्हणाले, “सुरुवातीपासूनच ही कथा तीन मैत्रिणींची होती. याबाबत आधीपासून आम्ही असे काही ठरवले नव्हते. आता पुरुषांच्या कट्टरवादाबद्दल काही निर्मात्यांनी मला ‘द केरला स्टोरी’चा सिक्वेल म्हणून एक चित्रपट ऑफर केला आहे.” सुदीप्तो सेन यांचे हे बोलणे आता चर्चेत आले आहे. त्यामुळे ‘द केरला स्टोरी’चा सिक्वेल येणार का? आणि त्यात काय दाखवले जाणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kerala story director sudipto sen hot offer of the kerala story sequel rnv
Show comments