सुदीप्तो सेन दिग्दर्शक असलेला ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा हिने प्रमुख भूमिका साकारली आहे. या भूमिकेने तिला वेगळी ओळख मिळाली. तिच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत असतानाच मराठी भाषेबद्दल तिने मांडलेलं मत चर्चेत आलं आहे.
अदा शर्माला उत्तम मराठी बोलता येतं. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मराठी कविता म्हणतानाचे काही व्हिडीओही शेअर केले होते. तिथे हे व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलेच आवडले. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिचं खूप कौतुक केलं. तर आता ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने मराठी भाषेची आवड तिला कशी निर्माण झाली हे सांगत या भाषेबद्दलचे तिचे विचार मांडले आहेत.
अदा म्हणाली, “मला मराठी भाषा खूप आवडते. मला मराठी कविता आवडतात आणि त्या मी अनेक वर्षांपासून म्हणत आले आहे. शाळेतही मराठी हा माझा आवडता विषय होता. मला आणि माझ्या पालकांना असं वाटतं की, जर तुम्ही महाराष्ट्रात जन्मला आहात, वाढला आहात तर तुम्हाला मराठी आलं पाहिजे. प्रत्येकालाच मातृभाषेबरोबरच देशभरातल्या शक्य तितक्या इतर भाषांची प्राथमिक माहिती असायला हवी.”
दरम्यान, अदा शर्माची प्रमुख भूमिका असलेल्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने कमाईचा २०० कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटाला तुफान प्रतिसाद दिल्याबद्दल अदाने आनंद व्यक्त करीत एका पोस्टच्या माध्यमातून प्रेक्षकांचे आभार मानले होते