सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपट प्रदर्शित होताच काही लोकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली. राजकीय संघटनांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत होती. चित्रपटाची कथा धर्मांतर केलेल्या चार महिलांची आहे, ज्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते.
चित्रपटाला काही लोकांनी प्रचंड विरोध केला, तर सामान्य लोकांनी हा चित्रपट उचलून धरला. मध्यंतरी या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने पीडित मुलींना बरोबर घेऊन एक पत्रकार परिषद घेतली ज्यात बऱ्याच गोष्टींचा त्यांनी उलगडा केला. तेव्हा चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनीदेखील यामागील विचार मांडले. आता नुकतंच या चित्रपटात ‘निमा’ या ख्रिश्चन मुलीचं पात्र साकारणारी अभिनेत्री योगिता बिहानी हिने या चित्रपटाला होणाऱ्या विरोधाबद्दल भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : “तू मनोरंजनक्षेत्रातली ‘पाटलीण’…” किरण माने यांची गौतमी पाटीलसाठी खास पोस्ट चर्चेत
‘फ्री प्रेस जर्नल’शी संवाद साधताना योगिता म्हणाली, “मी विपुल सर यांच्या मताशी सहमत आहे. हा चित्रपट प्रत्येकानेच पाहायला हवा. आम्ही यात एका हिंदू मुलीची आणि एक ख्रिश्चन मुलीचीही कहाणी दाखवली आहे. हा विषयच एवढा गंभीर आहे की, देशातील कानाकोपऱ्यांत हा चित्रपट दाखवला गेला पाहिजे. केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांनाही कट्टर बनवण्याचा कट रचला जात आहे. हा इस्लाम नाही, आतंकवाद आहे.”
योगिताचं चित्रपटातील काम पाहून तिला धमक्या येत असल्याचंही तिने स्पष्ट केलं, पण याकडे तिने दुर्लक्ष केलं आहे. चित्रपट पाहून बऱ्याच लोकांनी तिचं कौतुक केल्याचंही तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं. कोणताही मोठा स्टार नसूनसुद्धा या चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. जगभरात या चित्रपटाने २६४ कोटींचा गल्ला जमवला आहे.