‘द केरला स्टोरी’चे निर्माते व दिग्दर्शक यांचा पुढील चित्रपट ‘बस्तर : द नक्षल स्टोरी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांचा ठीकठाक प्रतिसाद मिळत आहे. ‘ द केरला स्टोरी’प्रमाणेच या चित्रपटावरही प्रोपगंडा चित्रपटाचा ठपका बसला अन् वेगवेगळ्या स्तरातून याला विरोध होऊ लागला. नक्षलवादासारख्या भयानक समस्येवर हा चित्रपट बेतलेला आहे. या चित्रपटाबरोबरच सिद्धार्थ मल्होत्राचा ‘योद्धा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला पण तरी ‘बस्तर : द नक्षल स्टोरी’ने चांगली सुरुवात केली आहे.
‘द केरला स्टोरी’च्या मानाने मात्र ‘बस्तर : द नक्षल स्टोरी’ची फारशी हवा नसल्याने पहिल्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचे आकडे चिंताजनक आहेत. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार ‘बस्तर : द नक्षल स्टोरी’ने पहिल्या दिवशी फक्त ५० लाखांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाची ऑक्युपन्सी ही केवळ ७.९७% एवढीच होती.
आणखी वाचा : रणदीप हुड्डा राजकारणात येणार का? अभिनेता स्पष्टच बोलला, “माझी अभिनयाची कारकीर्द…”
मुंबईत या चित्रपटाचे १९१ शोज तर दिल्लीत याचे २०६ शोज लावण्यात आले ज्याला प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. ‘द केरला स्टोरी’च्या प्रदर्शनाआधी निर्माण झालेल्या वादामुळे त्या चित्रपटाला चांगला फायदा झाला. ‘द केरला स्टोरी’ने पहिल्याच दिवशी ८ कोटींची कमाई केली होती. या तुलनेत ‘बस्तर : द नक्षल स्टोरी’ची पहिल्या दिवसाची कमाई ही नगण्यच आहे. त्यामुळे येत्या काळात हा चित्रपट ‘द केरला स्टोरी’प्रमाणेच छप्परफाड कमाई करेल याबद्दल शंका निर्माण झाली आहे.
भारतातील नक्षलवादाची समस्या, आपल्या जवानांनी या संघर्षात दिलेलं बलिदान अन् आपली न्यायव्यवस्था व राजकीय यंत्रणेचा फोलपणा यावर हा चित्रपट प्रामुख्याने भाष्य करतो. याची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली असून अभिनेत्री अदा शर्मा, इंदिरा तिवारी यांची यात महत्त्वाची भूमिका आहे. अद्याप चित्रपटाबद्दल फारशी चर्चा कुठे होत नसल्याने कमाईचे आकडे कमी असल्याचं सांगितलं जात आहे. हळूहळू हे आकडे वाढतील अशी शक्यताही ट्रेड एक्स्पर्टकडून वर्तवली गेली आहे.