The Kerala story Trailer : गेल्या वर्षी आलेला काश्मिरी पंडितांच्या समस्येवर आधारित चित्रपट ‘द कश्मीर फाईल्स’प्रचंड गाजला. या चित्रपटात १९९० च्या काळात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांची कथा दाखवण्यात आली आहे. आता यानंतर ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट येत आहे. विपुल अमृतलाल शाह यांचा आगामी चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. केरळ राज्यात बेपत्ता झालेल्या ३२,००० महिलांची कथा या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून नुकताच याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.
ट्रेलरमधून एक काल्पनिक कथानक मांडण्यात आलं असलं तरी केरळमधील त्या दुर्दैवी घटनेचं दाहक वास्तव आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. ट्रेलरमधून आपल्याला ३ हिंदू मैत्रिणी आणि त्यांच्याबरोबर असलेली एक मुस्लिम मैत्रीण यांची गोष्ट पाहायला मिळणार आहे ज्या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आणि धर्मांतर करून लग्न करून आतंकवादी संघटनेशी जोडल्या गेल्या. केरळमधील मुलींच्या या भयावह अपहरणामागील सत्य या चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणार आहे.
आणखी वाचा : ‘पोन्नियिन सेल्वन’ मधील ‘ही’ भूमिका अनुष्का शेट्टीने नाकारलेली; MeToo मोहीमेमुळे अभिनेत्रीने घेतला हा निर्णय
याबरोबरच चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अत्यंत हिंसक आणि हृदयद्रावक दृश्य तसेच काही बोल्ड संवादही ऐकायला मिळत आहेत. “अल्लाह हा या सृष्टीचा एकमेव कर्ता धर्ता आहे.” किंवा “हिजाब परिधान केलेल्या एकाही मुलीचा बलात्कार झालेला नाही.” असे वादग्रस्त संवादही या ट्रेलरमध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहेत. चित्रपटातून अशा धर्मांतर करून आयसीसमध्ये भरती झालेल्या असंख्य मुलींच्या वेदना मांडण्यात आल्या आहेत. २००९ पासून केरळ आणि बंगळुरूमधील हिंदू आणि ख्रिश्चन समुदायातील सुमारे ३२,००० मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले असून, त्यापैकी बहुतांश सिरिया, अफगाणिस्तान आणि इतर आयएसआयएस अशा भागात आहेत.
या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी, सिद्धी इदनानी या चार अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर बॉलिवूड निर्माते विपुल अमृतलाल शहा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ५ मे रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.