‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वाद सुरू आहे. चित्रपट तथ्यांवर आधारित नसून प्रोपगंडा करणारा असल्याचं केरळ सरकारने म्हटलं होतं. त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही केली गेली. मात्र कोर्टाने त्यास नकार दिला. सातत्याने सुरू असलेल्या या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वक्तव्य केलं होतं. बेल्लारी येथील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी ‘द केरला स्टोरी’वर भाष्य केलं. त्यानंतर चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनीही मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “दहशतवादी कट असलेल्या एका कथानकावर आधारित चित्रपट ‘केरला स्टोरी’ सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट केवळ एका राज्यातल्या दहशतवादी कटांवर आधारित आहे. केरळ हे देशातलं खूप सुंदर राज्य आहे. केरळमधले लोक खूप परिश्रमी आणि प्रतिभावान असतत. परंतु त्याच केरळमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कटाचा खुलासा या चित्रपटाने केला आहे. बॉम्ब-बंदूक आणि पिस्तूलाचा आवाज ऐकू येतो. परंतु समाजाला आतून पोखरण्याचा आवाज येत नाही. कोर्टानेही आतंकवादाच्या या स्वरुपाबाबत चिंता व्यक्त केल्या आहेत. परंतु आपल्या देशाचं दुर्भाग्य बघा. आपल्या समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या या दहशतवादी प्रवृत्तीच्या पाठीशी काँग्रेस उभी आहे.”
‘The Kerala Story’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले ‘इतके’ कोटी, आकडेवारी आली समोर
काय म्हणाले विपूल शाह?
“केरळ उच्च न्यायालयाने इतका चांगला निकाल दिला आणि आमच्या चित्रपटाबद्दल आदरणीय पंतप्रधान स्वतः बोलले. यापेक्षा सुंदर सकाळ होऊच शकत नाही, कारण आम्ही चित्रपटाद्वारे जो मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याबद्दलच पंतप्रधान बोलले. हा चित्रपट दहशतवादाविरुद्धचा चित्रपट आहे, तो कोणत्याही समुदायाच्या, धर्माच्या विरोधात नाही आणि त्याबद्दल माननीय पंतप्रधानांशिवाय कोणीही बोललं नाही,” असं विपुल शाह यांनी पीटीआयशी बोलताना म्हणाले.
दरम्यान, चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. दोन दिवस वीकेंड असल्याने चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.