‘द केरला स्टोरी’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसरीकडे, या चित्रपटावरून अनेक वादही निर्माण झाले आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर ममता सरकारने पश्चिम बंगालमध्ये बंदी घातली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली होती. बंदी उठवूनही पश्चिम बंगालमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला नव्हता. हा चित्रपट प्रदर्शित न करण्यामागे चित्रपटगृहांचे मालकही वेगवेगळी कारणे देत आहेत. परंतु आता पश्चिम बंगालमधीलच एका चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.
हेही वाचा- Video: हातात पांढरी उशी घेऊन जान्हवी कपूर पोहोचली विमानतळावर; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “चोर…”
मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमधील उत्तर नॉर्थ २४ परगणा येथील बनगावमध्ये सिंगल स्क्रीनवर ‘द केरला स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून चित्रपटाचे सारे शो हाऊसफुल्ल जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘ई टाइम्स’शी बोलताना ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक बिशाख ज्योती म्हणाले, “माझ्या शहरातील एक चित्रपटगृह आमचा चित्रपट दाखवत आहे याचा मला खूप आनंद आहे. बंगालमधील बहुतेक चित्रपटगृहे अजूनही ‘द केरला स्टोरी’ प्रदर्शित करण्यास तयार नाहीत. वितरक आणि चित्रपटगृहमालकांना चित्रपट प्रदर्शित करू नका, असे फोन येत आहेत. केवळ एकाच चित्रपटगृहात तर कदाचित इतर काही चित्रपटगृहांमध्ये विशेषत: सिंगल-स्क्रीन चित्रपटगृहांमध्येही चित्रपट प्रदर्शित होऊ लागला आहे. आम्हाला आशा आहे की, लवकरच पश्चिम बंगालच्या आणखी अनेक चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट दाखवला जाईल.
राज्यातील इतर चित्रपटगृहमालकांना पुढील दोन-तीन आठवडे ‘द केरला स्टोरी’ प्रदर्शित करणे कठीण जात आहे. आगामी काही दिवसांसाठी इतर चित्रपटांचे बुकिंग आधीच झाले असल्याचे चित्रपटगृहमालकांचे म्हणणे आहे. ‘एएनआय’शी बोलताना प्रिया एंटरटेन्मेंटचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, “हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे, परंतु आम्हाला खेद आहे की, पुढील दोन आठवड्यांसाठी सर्व स्लॉट भरले आहेत. अशा परिस्थितीत आधीच बुक केलेले स्लॉट रद्द करून नवीन चित्रपटासाठी जागा मिळवणे आमच्यासाठी कठीण आहे. दोन-तीन आठवड्यांनंतरच आपण ‘द केरला स्टोरी’च्या प्रदर्शनाबाबत विचार करू शकू.”
हेही वाचा– ‘बागेश्वर धाम’वर लवकरच चित्रपट येणार; कोण साकारणार महंत धीरेंद्र शास्त्री यांची भूमिका? घ्या जाणून
‘द केरला स्टोरी’च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने रिलीजच्या १८व्या दिवशी २०० कोटींचा आकडा पार केला आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा हा २०२३ सालातील दुसरा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या या रेकॉर्डब्रेक कमाईनंतर चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अदा शर्माने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.