‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. चित्रपटात कोणताही मोठा कलाकार नसताना, या सिनेमाने प्रेक्षकांची पसंती मिळवली. या चित्रपटाचे कथानक मुलींचे धर्मांतरण करून त्यांना आयसिसमध्ये कसे भरती केले जाते यावर आधारलेले आहे. यामध्ये अभिनेत्री अदा शर्माने मुख्य पात्र साकारले असून तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु, अदासोबत अभिनेत्री सोनिया बलानीचीही सर्वत्र चर्चा सुरू आहे.
हेही वाचा : ‘तारक मेहता…’ मालिकेतील मजेशीर व्हिडीओ शेअर करीत स्मृती इराणी म्हणाल्या, “लग्न झाल्यावर हे काम…”
अभिनेत्री सोनिया बलानीने ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात ‘आसिफा’ हे नकारात्मक पात्र साकारले आहे. ‘आसिफा’ या पात्राला बघून प्रेक्षकांनाही चीड येते. चित्रपटात मुलींचा ब्रेन वॉश करून त्यांना धर्मांतराकडे वळवण्यात ‘आसिफा’चा मोठा हात असल्याचे दाखवण्यात आले आहे. व्हिलनची भूमिका असली, तरी सोनियाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
दरम्यान, अशी नकारात्मक भूमिका स्वीकारण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न अभिनेत्री सोनिया बलानीला ‘अमरउजाला’च्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, “‘आसिफा’ हे नकारात्मक पात्र साकारण्याचा निर्णय मी स्वत: घेतला; कारण, ‘द केरला स्टोरी’मध्ये मुख्य आणि नकारात्मक पात्र या दोन भूमिका सर्वात महत्त्वाच्या होत्या. आज जे लोक माझ्या अभिनयाचे कौतुक करीत आहेत याचे संपूर्ण श्रेय माझी स्वर्गवासी आई शांता बाला आणि वडील रमेश बलानी यांना जाते. लोकांनी मला सोशल मीडियावर जेव्हा तुम्ही चित्रपटात चांगले काम केले आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या तेव्हा मला फार खूप छान वाटले.”
हेही वाचा : एके काळी घराचे भाडे द्यायलाही नव्हते पैसे…आज आहे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा ‘अर्जुन’
सोनिया बलानीने २०१६ मध्ये ‘तुम बिन’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सैफ अली खानसोबत ‘बाजार’ चित्रपटात तिने भूमिका साकारली. ‘द केरला स्टोरी’ हा सोनियाचा तिसरा चित्रपट असून तिने वेब सीरिजमध्येही काम केले आहे.