The Sabarmati Report Teaser : ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती. नुकताच या चित्रपटाचा थरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २७ फेब्रुवारी २००२ मध्ये गुजरातच्या गोधरा स्थानकावर साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेली दु:खद घटना आणि पीडितांची गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर दाखवली जाणार आहे.
‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये अभिनेता विक्रांत मेस्सी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. 12th Fail च्या यशानंतर आता त्याच्या आगामी चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत. यामध्ये विक्रांतचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळत आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये तो एका वस्तुस्थिती मांडणाऱ्या हिंदी पत्रकाराची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा : अदिती राव हैदरी व सिद्धार्थ यांनी लग्न नाही तर साखरपुडा केला, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…
‘द साबरमती रिपोर्ट’च्या टीझरमध्ये बरेच संवाद प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे, विक्रांत या घटनेला दुर्घटना किंवा अपघात मानायला तयार नसतो. यामुळे पत्रकाराची भूमिका साकारणारा हा अभिनेता विविध पुरावे शोधत असतो. शेवटी काही गोष्टींचा अभ्यास केल्यावर विक्रांत व रिद्धी डोग्रा “आग लगी नहीं लगाई गई है” असा संवाद साधत असल्याचं या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.
‘द साबरमती रिपोर्ट’च्या टीझरमध्ये साबरमती एक्स्प्रेसला “आग लागली नाही लावली”, “हा केवळ अपघात किंवा दुर्घटना नव्हती” असे बरेच मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.
“२२ वर्षांपूर्वी गोधरा रेल्वेस्थानकात ज्या ५९ लोकांनी त्यांचे प्राण गमावले. त्या सगळ्यांना आज आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत. याबरोबरच ‘द साबरमती रिपोर्ट’चा टीझर मी शेअर करत आहे. हा चित्रपट ३ मे २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.” असं विक्रांत मेस्सीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
हेही वाचा : मुंबईचा सलग दुसरा पराभव; हैदराबादने सामना जिंकल्यावर मराठी अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली, “न भूतो न भविष्यति…”
दरम्यान, ‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये विक्रांत मेस्सी प्रमुख भूमिकेत झळकणार असून त्याच्यासह रिद्धी डोग्रा, राशी खन्ना या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. ३ मे २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.