नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट शुक्रवारी (२८ सप्टेंबर रोजी) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. ‘द काश्मीर फाइल्स’सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’कडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे.
‘द व्हॅक्सिन वॉर’ने पहिल्या दिवशी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. हा चित्रपट करोना महामारी, त्यावेळी देशात असलेली परिस्थिती, देशाने केलेला या भयंकर साथीचा सामना आणि भारतातील लसनिर्मितीची गोष्ट सांगणारा आहे. तीन वर्षांपूर्वी आलेल्या या भयंकर आजाराच्या आठवणी ताजा करणारा हा चित्रपट कसा असेल, याची जोरदार चर्चा होती. पण पहिल्या दिवसाची कमाई पाहता प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे.
नाना पाटेकरांनी सांगितलं राग येण्यामागचं कारण; म्हणाले, “तुमची पात्रता…”
‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘द व्हॅक्सिन वॉर’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त १ कोटी ३० लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. कमी बजेटमध्ये बनलेला ‘द व्हॅक्सिन वॉर’ देशातील १००० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, बंगाली, पंजाबी, भोजपुरी, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम, गुजराती आणि मराठी अशा ११ भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
दरम्यान, ‘द व्हॅक्सिन वॉर’ मध्ये नाना पाटेकर यांच्याशिवाय अनुपम खेर, सप्तमी गौडा, पल्लवी जोशी, गिरीजा ओक आणि रायमा सेन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशी यांनी केली आहे.