करोना काळातील लॉकडाउन आणि स्वदेशी लस निर्मितीवर आधारित ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट रिलीज होऊन आठवडा उलटला आहे. विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाइल्स’ सुपरहिट ठरला होता, त्यामुळे हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करेल, असं वाटलं होतं पण तसं झालं नाही. अशातच या चित्रपटाचे शो महाराष्ट्रातील एका शहरात हाऊसफुल्ल झाले आहेत.
कंगना रणौतचा ‘चंद्रमुखी २’ गाशा गुंडाळणार? सात दिवसांची कमाई फक्त ‘इतकी’
चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आठवडाभरात दिसून आलं. चित्रपट १० कोटींचीही कमाई करू शकलेला नाही. याचदरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. “हळूहळू द व्हॅक्सिन वॉर भारताला प्रेरणा देत आहे. चित्रपटगृहे तुडुंब भरत आहेत. तुम्हीही द व्हॅक्सिन वॉरचे ग्रुप बुकिंग करू शकता. Yes, INDIA CAN DO IT,” असं त्यांनी लिहिलं आहे.
विवेक अग्निहोत्रींनी शेअर केलेला हा व्हिडीओ अमरावतीचा आहे. इथल्या ब्रिजलाल बियाणी सायन्स कॉलेजमधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहिला. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘इंडिया कॅन डू इट’ अशा घोषणाही देण्यात आल्या.
दरम्यान, चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये नाना पाटेकर डॉ. बलराम भार्गव यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. तर, पल्लवी जोशी, रायमा सेन, गिरीजा ओक गोडबोले, अनुपम खेर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.