सध्या बॉलिवूडमध्ये शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. चित्रपट कमाईचे नवनवीन विक्रम रचत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाने १२० कोटींची कमाई केली आहे. चित्रपट पाहण्यासाठी चाहते गर्दी करत असून थिएटर्सबाहेर हाऊसफूलचे बोर्ड लागत आहेत. संपूर्ण भारतात ‘पठाण’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. अगदी काश्मीरमध्येही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय.
‘नवभारत टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख खानच्या ‘पठाण’ची काश्मीरमध्ये जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देत आहे. काश्मीर खोऱ्यातील लोक या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. तब्बल ३२ वर्षांनंतर काश्मीरमधील सर्व चित्रपटगृहे हाऊसफुल्ल झाल्याचं पाहायला मिळालंय. यापूर्वी अशी क्रेझ इतर कोणत्याही चित्रपटासाठी दिसली नाही.
सोशल मीडियावर एक ट्विटही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन चाहते एका चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचा बोर्ड लावून उभे आहेत. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे काश्मीरमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे चाहते शाहरुखचे आभार मानत आहेत. “तब्बल ३२ वर्षांनी काश्मीर खोऱ्यात हाऊसफुलचा बोर्ड परत आणल्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत,” असं चाहत्यांनी शाहरुख खानला म्हटलंय.
दरम्यान, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खान चार वर्षांनी मुख्य भूमिकेत मोठ्या पडद्यावर परतला आहे. चित्रपटावर बॉयकॉटचं सावट होतं, पण प्रेक्षकांनी चित्रपटाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. चित्रपट सर्वाधिक ओपनिंग करणारा ठरला आहे. चित्रपटाने ‘केजीएफ’ आणि ‘बाहुबली’, ‘वॉर’सारख्या चित्रपटांनाही मागे टाकलंय. अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाने १०० कोटींचा आकडा ओलांडला आहे.