पति-पत्नीच्या नात्याला आणखीन दृढ करण्यासाठी ज्याप्रमाणे वटपौर्णिमेचे महत्त्व असते, त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि भारतातील इतर काही भागांमध्ये करवा चौथ साजरा केला जातो. कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थीचा दिवस महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करुन रात्री चंद्रदर्शन केल्यानंतर हा उपवास सोडला जातो. असा हा करवा चौथचा उपवास बॉलिवूड सेलिब्रिटींच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असतो. कित्येक बॉलिवूड चित्रपटांमधून या प्रथेचं दर्शन घडलेलं आहे. येत्या १३ तारखेला देशभरात ‘करवा चौथ’ साजरा करण्यात येणार आहे.
काही अभिनेत्री या प्रथेचं काटेकोरपणे पालन करतात तर काही अभिनेत्रींनी याविषयी वादग्रस्त वक्तव्यं केली होती. ‘करवा चौथ’बद्दल या बॉलिवूड अभिनेत्रींनी केलेल्या वक्तव्यामुळे त्या चांगल्याच ट्रोल झाल्या होत्या. यामध्ये करीना कपूर, रत्ना पाठक शहा, ट्विंकल खन्ना यांचा समावेश होता. अभिनेत्री रत्ना पाठक या एका मुलाखतीमध्ये या प्रथेबद्दल भाष्य करताना म्हणाल्या, “आपला समाज दिवसागणिक आणखीनच रूढीवादी होत चालला आहे. अंधविश्वासू होत चाललो आहोत. धर्म हीच एकमेव महत्तावची गोष्ट आहे हे आपण लोकांवर थोपवत आहोत. गेल्यावर्षी मला कुणीतरी विचारलं की तुम्ही ‘करवा चौथ’ करत नाही का? त्यावर मी उत्तरले की मला वेड नाही लागलंय. सुशिक्षित महिलांनी हे असं वागणं विचित्र नाही वाटत,”
आणखी वाचा : जान्हवी कपूरने केला श्रीदेवी यांच्या लोकप्रियतेबद्दल खुलासा; म्हणाली “तिच्या आसपासही कुणी…”
याबद्दल ट्विंकल खन्नानेही असंच वक्तव्य केलं होतं. ट्विंकल म्हणाली, “आजकाल वयाच्या ४० मध्ये लोकं दुसरं लग्न करतात, मग नवऱ्यासाठी उपवास करण्यात काय अर्थ आहे? इतरही देशात बायकांनी उपवास न करता पुरुषमंडळी चांगलं मोठं आयुष्य जगतात.” अभिनेत्री करीना कपूरनेही करवा चौथबद्दल असंच भाष्य केलं होतं. करीनाचं असं म्हणणं आहे की नवऱ्याप्रती असलेलं प्रेम सिद्ध करण्यासाठी उपवास करण्याची काहीच गरज नाही.
बॉलिवूड चित्रपटांमध्ये ‘करवा चौथ’ ही प्रथा अगदी थाटामाटात दाखवली जाते आणि बॉलिवूडच्याच या काही अभिनेत्रींनी केलेल्या या अशा वक्तव्यामुळे त्यांची खूप आलोचना झाली होती. सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोलही केलं होतं. तुम्ही विश्वास ठेवत नाही तर मग चित्रपटात या गोष्टींचा दिखावा का करता असाही सवाल तेव्हा नेटकऱ्यांनी केला होता.