ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटल्यापासून रणबीर कपूरच्या आगामी ‘रामायण’ या चित्रपटाकडे प्रेक्षक फार आस लावून बसले आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी निश्चित झाला आहे. तर सीतेच्या भूमिकेसाठी जान्हवी कपूर व दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी यांच्या नावाची चर्चा सुरू होती, पण जान्हवी कपूरने या सगळ्या बातम्या खोट्या असल्याची पुष्टी केली.
मध्यंतरी या चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या. आधी सीतेच्या भूमिकेत आलिया भट्ट दिसणार होती, पण काही कारणास्तव तिने यातून काढता पाय घेतला अन् आता तिथे साई पल्लवीची वर्णी लागल्याचं स्पष्ट झालं. इतकंच नव्हे तर यामध्ये केजीएफ स्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली तसेच सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार असल्याचंही समोर आलं. याबरोबरच लारा दत्ता, हरमन बावेजासारखे कलाकारही यामध्ये झळकणार सांगितलं जात होतं. आता या चित्रपटाबद्दल बाहेर आलेल्या बऱ्याचशा गोष्टी या अफवा आहेत हे नुकतंच एका मीडिया रिपोर्टमधून समोर आलं आहे.
आणखी वाचा : २० कोटींचे बजेट, १०० कोटींची कमाई करणारा ‘आर्टिकल ३७०’ येणार ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहायला मिळणार?
‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार अद्याप केवळ रणबीर कपूर व साई पल्लवी यांचंच कास्टिंग झाल्याचे वृत्त खरे असल्याचं सांगितलं जात आहे. इतर कलाकारांचे कास्टिंग झाले नसून बाहेर येणाऱ्या बातम्या या अफवा आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर यंदा एप्रिल महिन्यात राम नवमीच्या दिवशी या चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल अधिकृत घोषणा होणार असल्याची बातमीही समोर आली होती. हे वृत्तदेखील अफवाच असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
चित्रपट लांबणीवर पडण्याचं कारण काही वेगळंच आहे, काही आंतरिक मतभेद आहेत जे दूर होणं फार गजरेचं आहे अन् ते झाल्यावरच या चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल ही भूमिका याच्या निर्मात्यांनी घेतली असल्याचं सांगितलं जात आहे. सध्यातरी या चित्रपटामध्ये रणबीर कपूर व साई पल्लवी दिसणार असल्याच्या बातमीचीच पुष्टी करण्यात आली आहे. इतर सर्व बातम्या या खोट्या असल्याचा दावा सध्या केला जात आहे.